मुंबईकरांनो, सावध व्हा! मुंबई अदानीशासित करण्याचा भाजपचा डाव, आदित्य ठाकरे यांचा घणाघात

चंदिगड संपूर्णपणे केंद्रशासित करून पंजाबपासून तोडण्याचा प्रयत्न झाला तीच मानसिकता मुंबईसाठीही धोक्याची आहे. मुंबई अदानीशासित करण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव आहे, असा घणाघात शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला. मुंबईकरांना सावध राहण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. चंदीगडमध्ये निवडणूक फिक्स करण्याचा प्रयत्न झाला. त्या अधिकाऱ्याला पकडूनही त्याला काही शिक्षा झाली नाही, पण फिक्सिंग पकडल्यामुळे भाजपला महापौरपद मिळाले नाही. त्यानंतर चंदिगड पंजाबपासून तोडून, संपूर्णपणे केंद्रशासित आणि पंजाबपासून दूर करण्याचा प्रयत्न आता सुरू होता. संसदेत तसे बिलही येणार होते. पंजाबने या गोष्टीला कडाडून विरोध केल्यानंतर आता आम्ही असे काही केलेच नाही असे सरकार म्हणतेय, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

भाजपने आता मुंबई सरळ अदानी समूहाच्या ताब्यात देण्याचा पर्यायी मार्ग शोधला आहे. धारावी ‘पुनर्विकास’, मिठी नदी प्रकल्प, मोकळे भूखंड…जसे काही विकास आणि पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबई अदानी समूहाला ‘भेट’ देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

मुंबई महाराष्ट्राची नव्हे तर यांच्या मालकीची करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा जोरदार हल्ला आदित्य ठाकरे यांनी केला आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ज्यासाठी आपण लढलो; प्राणपणाला लावून मुंबई जिंकली, ती मुंबई…अदानी समूहाच्या हातात जाऊ द्यायची का, असा सवालही त्यांनी मुंबईकरांना केला आहे.