
ओवायओ (ओयो) हॉटेलमध्ये एक तासासाठी खोली भाडय़ाने दिली जाते. ही कशासाठी दिली जाते? हा पोलिसांच्या अभ्यासाचा विषय आहे. संस्कृतीरक्षकांचे सरकार आहे. इथे जर संस्कृतीचा ऱ्हास होत असेल तर गृह विभागाने ओवायओचा अभ्यास करावा, अशा शब्दांत भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला घरचा आहेर दिला.
पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना सुधीर मुनगंटीवार यांनी ओयो हॉटेलच्या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ओवायओ नावाची हॉटेल साखळी तयार झाली आहे. शहराच्या बाहेर ही हॉटेल आहेत. या हॉटेलसाठी कोणत्याही ग्रामपंचायत, नगरपंचायत, महापालिकेची परवानगी घेतली जात नाही. ओयोची किती हॉटेल्स आहेत त्याची माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी गृह विभागाकडे केली.
मालक एफआयआर खिशात ठेवतात
शेतकऱ्यांना महागडे खत घ्यायला लावले जात आहे. संबंधिक अधिकारी अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केल्याचे सांगतात; पण कंपन्यांचे मालक एवढे श्रीमंत आहेत की, ते गुन्हा दाखल झाला तरी हा एफआयआर खिशात ठेवण्याची क्षमता त्यांची आहे असे मुनगंटीवार म्हणाले.