
पावसाचे पाणी सोडून रस्त्याची दुरवस्था करणाऱ्या ‘एसआरए’ विकासक मेसर्स चांदिवाला डेव्हलपर्सच्या विरोधात पालिकेने ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. ओशिवरा उद्यान मार्गावरील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प विकासकाने पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याचेही समोर आले आहे. जोगेश्वरी पश्चिम येथील स्वामी विवेकानंद मार्गावर ओशिवरा उद्यान आहे. या रस्त्यावर काँक्रिटीकरण प्रस्तावित असून ऑक्टोबर 2025 मध्ये हे काम सुरू होईल. दरम्यान, या रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजवण्यात आले. हे काम सुरू असताना एसआरए विकासकाने पाण्याच्या निचऱ्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नसल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे, एसआरए प्रकल्पात साचलेले पाणी पंपाने उपसून थेट रस्त्यावर सोडण्यात येत असल्याचे समोर आले होते.




























































