
राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्याबाबत शिक्षणतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आलेली आहे. ही समिती आज 28 नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मुंबईकरांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेणार आहे.
उद्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी सकाळी 10 वाजता नोंदणी सुरू होणार असून प्रत्यक्ष चर्चासत्राला 10.30 वाजता सुरुवात होणार आहे. चर्चासत्रात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी समितीने प्रश्नावली आणि मतावली http://tribhashasamiti.mahait.org या लिंकवर उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांनी दिली आहे.
राज्य सांस्कृतिक पुरस्काराला वामनदादा कर्डक यांचे नाव
लोककला क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्काराला लोककवी वामनदादा कर्डक यांचे नाव देण्यात आले आहे. यासंदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने आज ‘शासन निर्णय’ जारी केला. यापुढे या पुरस्काराला ‘लोककवी वामनदादा कर्डक राज्य सांस्कृतिक पुरस्कार-लोककला क्षेत्र’ या नावाने ओळखले जाणार आहे. राज्यातील लोककला परंपरेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलावंतांना सन्मानित करण्यासाठी राज्य सरकार दरवर्षी सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करते. या पुरस्काराला मान्यवर व्यक्तिमत्त्वाचे नाव देण्याचा प्रस्ताव काही काळ विचाराधीन होता.
लोककलेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या वामनदादा कर्डक यांच्या दीर्घकालीन कार्याचा सन्मान म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. महाराष्ट्रातील लोककलेचा ठसा उमटवणारे, सामाजिक बदलाचे प्रवर्तक आणि दलित साहित्य चळवळीचे सांस्कृतिक व्यासंगी म्हणून वामनदादा कर्डक यांचे नाव विशेष मानाने घेतले जाते.




























































