गेली 45 वर्षे गुजरात महाराष्ट्राचे 11 टीएमसी पाणी वापरत आहे! विरोधकांनी सरकारला विचारला जाब

eknath-khadse

नर्मदा नदीचा पाण्याचा प्रश्न कधी सुटणार, असा सवाल करत गेली 45 वर्षे गुजरात महाराष्ट्रच्या वाटय़ाचे 11 टीएमसी पाणी वापरत आहे. हे थांबले पाहिजे. हे पाणी आणखी किती वर्षे वापरणार? नंदुरबारच्या आदिवासींना आजही पाणी मिळत नाही. एका एका थेंबासाठी भांडणे सुरू आहेत. सरकारने यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी सरकारकडे केली.

नर्मदा पाणी वाटपावरून खडसे यांनी विधान परिषदेत प्रश्न विचारत सरकारला जाब विचारला. त्याला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, निवाडय़ानुसार महाराष्ट्राच्या वाटय़ाला 10.89 टीएमसी पाणी येते. हे पाणी नंदुरबार जिह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी भागाला देण्यासाठीची प्रक्रिया येत्या एक वर्षात पूर्ण केली जाईल. यावेळी शशिकांत शिंदे, सतेज पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला. दरम्यान, तापी आणि नर्मदा नदीचे पाणी मिळवण्यासाठी बोगदा कधी तयार करणार? सध्या सुरू असलेल्या सर्वेक्षणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप चंद्रकांत रघुवंशी यांनी केला.

दोन प्रकल्प राबवणार

नंदुरबार जिह्यातील धडगाव, अक्कलकुवा हे भाग डोंगराळ असल्याने पाणी अडवण्यात अडचणी आहेत. भौगोलिक परिस्थितीमुळे नर्मदा नदीतून 5 टीएमसी आणि तापी नदीतून 5.59 टीएमसी पाणी घेण्याचा करार गुजरात राज्याशी 2015 मध्ये करण्यात आला आहे. या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी 5 हजार 517 कोटींचा एक आणि 957 कोटींचा एक असे दोन प्रकल्प राबवण्यात येत आहेत. त्याचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे. याच्या सर्व मंजुऱया आठ ते दहा महिन्यांत देण्यात येतील आणि येत्या एक वर्षात हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे महाजन म्हणाले.