मिंधे पुन्हा रुसले, घरी जाऊन बसले; सह्याद्रीवरील सर्वच बैठकांना गैरहजर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा महायुती सरकारमध्ये नाराज असल्याचे आज दिसून आले. सह्याद्री अतिथीगृहावरील एकाही बैठकीला ते उपस्थित राहिले नाहीत. सह्याद्रीवर महत्त्वाच्या बैठका सुरू असताना शिंदे ठाण्यातील आपल्या घरी होते असे सूत्रांकडून समजते.

सह्याद्री अतिथीगृहावर आज सात बैठका होत्या. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, वृक्ष लागवड मोहीम, रोजगार हमी योजना विभागाचा आढावा, फलोत्पादन विभागाचा आढावा, आरोग्य विभागाचा आढावा, नक्षलग्रस्त जिह्यातील मानसेवी डॉक्टरांसोबत बैठक अशा या महत्त्वाच्या बैठका होत्या. त्या बैठकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संबंधित विभागांचे मंत्री उपस्थित होते, पण एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. या बैठकांना उपस्थित राहणार असल्याचा नियोजित कार्यक्रम शिंदे यांच्या प्रसिद्धीमाध्यम विभागाकडून जाहीर केला गेला होता. तरीसुद्धा ते बैठकांना उपस्थित राहिले नाहीत.

मंगळवारी एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील मंत्र्यांशी सह्याद्रीवर चर्चा केली होती. प्रत्येक मंत्र्याने त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे निधी देत नसल्याबद्दल तक्रार केली होती. भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना निधी मिळतो, पण आपल्या मंत्र्यांना निधी देण्यास टाळाटाळ होते याबद्दल शिंदे नाराज होते. आजच्या गैरहजेरीमागे तीच नाराजी कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.