
पश्चिम रेल्वे मार्गावरील वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या विरार स्थानकात 15 डबा लोकलच्या थांब्यासाठी दोन प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यात आला. विरार-डहाणू रोड चौपदरीकरण प्रकल्पा अंतर्गत विरार स्थानकाच्या क्षमतावाढीचे काम केले जात आहे. त्यानुसार मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) विक्रमी वेळेत विरार स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 3ए आणि 4ए यांचा विस्तार केला. रविवारी पश्चिम रेल्वेने एमआरव्हीसीच्या समन्वयाने ईएमयू गाडीची यशस्वी चाचणीदेखील केली.
एमयूटीपी-3 प्रकल्पा अंतर्गत एमआरव्हीसीमार्फत विरार-डहाणू रोड चौपदरीकरणाचे काम केले जात आहे. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून विरार स्थानकाची क्षमतावाढ करण्याच्या दृष्टीने प्लॅटफॉर्म क्रमांक 3ए आणि 4ए यांची रुंदी 6.50 मीटरवरून 10.50 मीटरपर्यंत वाढविण्यात आली. 15 डब्यांच्या लोकल गाडय़ा थांबविण्यासाठी दोन्ही प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यात आला आहे. यापूर्वी या प्लॅटफॉर्मवर 12 डब्यांच्या लोकल गाडय़ा थांबत होत्या. दोन्ही प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम अवघ्या चार महिन्यांच्या विक्रमी कालावधीत पूर्ण करण्यात आले. तसेच नवीन होम प्लॅटफॉर्म क्रमांक ‘5ए’चे बांधकाम पश्चिमेकडील बाजूला करण्यात येत आहे. उन्नत प्लॅटफॉर्म लवकरच झोनल रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात येईल. त्यामुळे तेथून 15 डब्यांच्या लोकलची सेवा सुरू होईल, असे एमआरव्हीसीने म्हटले आहे.
विरार रेल्वे स्थानकावरील दोन प्लॅटफॉर्मचे पूर्ण झालेले काम हे प्रवाशी सेवेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. एमआरव्हीसी आणि पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने रेल्वे स्थानकांच्या क्षमतावाढीची कामे केली जात आहेत. त्यामुळे उपनगरी रेल्वे प्रवास सुरक्षित आणि सुलभ होईल.
विलास वाडेकर, अध्यक्ष, एमआरव्हीसी




























































