
मिंधे गटाचेआमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला निकृष्ट जेवणावरून मारहाण केल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तात्काळ कारवाई केली. एफडीएने यावर कारवाई करत कॅन्टीनच्या चालकाचा परवाना निलंबित केला आहे. तसेच अजंता कॅटरर्सच्या खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले.
दरम्यान, संजय गायकवाड हे सध्या विधी मंडळाच्या अधिवेशनासाठी मुंबईत आले आहेत. ते आमदार निवासात राहत असून मंगळवारी त्यांनी तिथल्याच कॅन्टीनमधून जेवण मागवले होते. मात्र त्या जेवणातील डाळीला वास येत असल्याने संजय गायकवाड हे थेट बनियन टॉवेलवरच कॅन्टीनमध्ये पोहोचले. तिथे जाऊन त्यांनी कॅन्टीन ऑपरेटरला बोलावले व डाळीबाबत जाब विचारला. त्यानंतर त्यांनी त्याला मारहाण केली. यावेळी आमदारांसोबत असलेल्या काही लोकांनी देखील संधी साधत कॅन्टीन ऑपरेटवर हात साफ केला. या घेतानाच व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर आता कॅन्टीनच्या चालकाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.