Mumbai News – मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग; इंडिगो, स्पाईसजेट, अकासा विमानांच्या उड्डाणाला फटका

मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. पावसामुळे शहरतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतील रस्ते वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. मुंबईतील रस्त्यांवर मोठी वाहतूककोंडी झाली आहे. मुंबई विमानतळावरील विमान उड्डाणांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसामुळे विमान वाहतूक प्रभावित झाली आहे.

पावसामुळे इंडिगो, स्पाईसजेट, अकासा एअरलाईनच्या विमानांचे उड्डाणाला विलंब होत आहे. यामुळे विमान प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. एअरलाईन्स कंपन्यांकडून एक्सवर पोस्ट करत निवेदन जारी करण्यात आले आहे.

हवामानाच्या स्थितीकडे आपण बारकाईने लक्ष ठेवून आहोत. शक्य तितक्या लवकर आणि सुरक्षितपणे विमान सेवा सामान्यपणे सुरू करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे, असे इंडिगोने आपल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी इंडिगोच्या वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवर त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्याचे आवाहनही कंपनीने केले आहे.

स्पाइसजेटने देखील ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. मुंबईतील खराब हवामानामुळे विमानाच्या सर्व निर्गमन/आगमन आणि उड्डाणांवर परिणाम होऊ शकतो. प्रवाशांना त्यांच्या फ्लाइटच्या स्थितीवर लक्ष ठेवण्याची विनंती कंपनीने केली आहे.