कामाठीपुराचा पुनर्विकास लांबणीवर, निविदा प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ

दक्षिण मुंबईतील 34 एकर जागेवर वसलेल्या कामाठीपुराच्या समूह पुनर्विकासासाठी बांधकाम व विकास या तत्त्वावर विकासक नेमण्यासाठी म्हाडातर्फे निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र, विकासकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे कामाठीपुराच्या निविदा प्रक्रियेला तिसऱयांदा म्हणजेच 11 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी 28 जुलै त्यानंतर 25 ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती.

कामाठीपुरा येथील 1 ते 15 या गल्ल्यांमध्ये सुमारे 943 उपकरप्राप्त इमारती आहेत. यामध्ये सुमारे 6625 निवासी व 1376 अनिवासी असे एकूण 8001 रहिवासी वास्तव्यास असून 800 जमीन मालक आहेत. या क्षेत्रातील इमारती शंभर वर्षे जुन्या आहेत. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत कामाठीपुराचा समूह पुनर्विकास करण्यात येणार असून एजन्सी नियुक्त करण्यासाठी 12 जून रोजी निविदा जाहीर करण्यात आली होती. पुनर्विकासातून येथील 8001 रहिवाशांना प्रत्येकी 500 चौरस फुटांचे हक्काचे घर मिळणार आहे.

म्हाडाला घरे मिळणार

कामाठीपुरा पुनर्विकासाच्या माध्यमातून म्हाडाला 44 हजार चौ. मी. क्षेत्र विकासकांकडून उपलब्ध होणार असून मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हाडाला मोठय़ा प्रमाणात गृहसाठा उपलब्ध होणार आहे. तसेच विकासकाला 5,67,000 चौ. मी. क्षेत्र उपलब्ध होणार असून अंदाजे 4500 घरे उपलब्ध होणार आहेत.