
दोन महिन्यांपूर्वी जुलै महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करत लोकार्पण करण्यात आलेल्या कर्नाक म्हणजेच सिंदूर पुलाला तिसऱ्या महिन्यातच गळती लागली आहे. पुलाच्या सांध्यांमधून ही गळती होत असल्याचे दिसून आले आहे. या निष्काळजीपणाबद्दल संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मस्जिद बंदर रेल्वे स्थानकांदरम्यान महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून हा पूल नव्याने उभारला. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर त्याचे लोकार्पण झाल्याने त्या पुलाचे नामकरणही सिंदूर असे करण्यात आले. मात्र पहिल्याच पावसात त्या पुलाला गळती लागली आहे. पावसाचा जसा जोर असेल तशा प्रमाणात या पुलाच्या सांध्यांमधून गळती होते. ते पाणी रेल्वेच्या जलद मार्गावरील रुळांवर पडत आहे. त्याचवेळी एखादी लोकल तिथून गेली तर प्रवाशांच्या अंगावर ते पाणी पडते.
गर्डरवर गंज
या पुलासाठी रेल्वेमार्गाच्या वरून टाकण्यात आलेल्या एका गर्डरला गंज लागल्याचे दिसत असून तिथूनच पाण्याची गळती होत आहे. दोन महिन्यांतच गर्डरला गंज लागणे ही बाबही गंभीर असल्याचे बोलले जात आहे.
19 ऑक्टोबर 2024 ः महापालिकेने या पुलासाठी 550 मेट्रिक टन वजनाचा पहिला गर्डर स्थापित केला.
19 जानेवारी 2025 ः पुलाचा दुसरा गर्डर बसविण्यात आला.