
एटीएम मशीनमध्ये पट्टी लावून फसवणूक करणाऱ्या टोळीला मालाड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मोहमद आरीफ युसूफ खान, अब्दुल हकीक खान आणि दानिश अली खान अशी त्या तिघांची नावे असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने अंधेरी, वांद्रे, कांदिवली, बोरिवली, चेंबूर आणि मालाड परिसरातील एटीएममधून पैसे काढल्याचे उघड झाले.
तक्रारदार हे गेल्या आठवड्यात एका सरकारी बँकेच्या एटीएममध्ये गेले होते. त्यानी त्याचे डेबिट कार्डवरून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे कार्ड एटीएम मशीनमध्ये अडकले होते. त्याच दरम्यान एक जण आला. त्याने मदत करण्याचा बहाणा करून त्याचे एटीएम कार्ड काढले. त्याच दरम्यान त्याने तक्रारदार याच्या एटीएम कार्डचा पासवर्ड पहिला होता. त्यानंतर त्याने कार्डची चोरी करून खात्यातून 40 हजार रुपये काढले. खात्यातून पैसे गेल्याचा त्याना मेसेज आला. फसवणूक झाल्या प्रकरणी त्याने मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक दुष्यत चव्हाण याच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक रायवाडे, जुवाटकर, गोंजारी, फर्नांडिस, शेरे, वाघ आदींच्या पथकाने तपास सुरू केला.
तपासा दरम्यान पोलिसांनी त्या सेंटर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एका फुटेजमध्ये पोलिसांना एक संशयास्पद वाहन दिसले. त्यावरून तपासाची चक्रे फिरली. पोलिसांनी त्या वाहनाची माहिती काढली. त्यानंतर पोलिसांनी त्या तिघांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने फसवणुकीची कबुली दिली.