Mega Block – रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत अप आणि डाउन धीम्या मार्गावर ब्लॉक असणार आहे.

ब्लॉक काळात सीएसएमटीहून सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील गाड्या सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि विद्याविहार स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील.

सकाळी 10.19 ते दुपारी 3.52 पर्यंत घाटकोपरहून सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या विद्याविहार आणि सीएसएमटी मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान थांबतील.

रविवारी हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक असेल. सकाळी 10.17 ते दुपारी 3.47 पर्यंत पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या सेवा बंद राहतील. ब्लॉक वेळेत सीएसएमटी ते कुर्ला, पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जातील. ब्लॉक वेळेत प्रवासी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान प्रवास करू शकतील.