
मदरशात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मालवणी येथे घडली. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे. मृत मुलगा हा मालाडच्या मालवणी येथे कुटुंबीयांसोबत राहतो.
मालवणी गेट क्रमांक 10 येथे एक मदरसा आहे. त्या मदरशामध्ये मृत मुलगा आणि त्याचा मोठा भाऊ शिक्षण घेतो. त्या मदरशामध्ये आणखी 12 मुले शिक्षण घेतात. शनिवारी मृत मुलगा आणि त्याचा भाऊ मदरशामध्ये गेले होते. रात्री मुलाने मदरशात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मुलाच्या भावाच्या लक्षात आला. याची माहिती मालवणी पोलिसांना देण्यात आली.
काही वेळात मालवणी पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी मुलाला खाली उतरवले. त्याला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. घडल्या प्रकरणी मालवणी पोलिसांनी मुलाचे आईवडील, मोठा भाऊ आणि मौलाना यांचा जबाब नोंदवला आहे. मुलाच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.