Mumbai News – क्रिकेट प्रशिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक

क्रिकेट प्रशिक्षकानेच 13 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबईतील गोवंडी परिसरात सदर घटना घडली असून पोलिसांनी आरोपी प्रशिक्षकाला अटक केली आहे. राजेंद्र पवार असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीवर याआधीही अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

पीडित मुलगी घाटकोपर येथील रहिवासी असून गोवंडी येथे क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यासाठी जात असे. यावेळी नराधम प्रशिक्षकाने मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. याबाबत कुठे वाच्छता न करण्याबाबत धमकी दिली होती. मात्र मुलीच्या वागण्यातील बदल पाहून पालकांना संशय आला. त्यांनी मुलीला विश्वासात घेत विचारले असता सर्व आपबीती सांगितली. यानंतर पालकांनी पंतनगर पोलिसात धाव घेत फिर्याद नोंदवली.

सदर घटना देवनार हद्दीत घडल्याने याचा तपास देवनार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. देवनार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपी माजी रणजी खेळाडू असल्याचे समजते. आरोपीला न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.