
सात वर्षांची देवांशी गेल्या अनेक महिन्यांपासून यकृताच्या गंभीर आजाराशी झुंज देत होती. त्यावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हाच एकमेव पर्याय होता. पण त्यासाठी वीस लाख रुपयांचा खर्च परवडणारा नव्हता. पण मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने दिलेल्या आर्थिक आधारामुळे आणि आईने यकृत दिल्यामुळे मुलगी देवांशीचे प्राण वाचले आणि गावंडे कुटुंबीयांकडे खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली.
वाशीम जिह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील वरूड (बु) येथे राहणारे रवींद्र गावंडे यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांची मुलगी देवांशी पोटदुखी, ताप, मळमळ होणे आदींमुळे सतत आजारी पडत होती. पालकांनी सुरुवातीला मंगरूळपीर आणि अकोला येथे तिच्यावर उपचार केले. परंतु तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने अखेर तिला नागपूर येथे हलविण्यात आले.
वैद्यकीय तपासणीनंतर, तज्ञ डॉक्टरांनी तिचे यकृत गंभीर स्वरूपात बाधित झाल्याचे निदान केले. त्यावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. पण खर्च परवडणारा नसल्याने त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष, टाटा ट्रस्टच्या माध्यमातून उपचाराची मोठी रक्कम उभी केली. उर्वरित रक्कम इतर काही सामाजिक संस्था आणि गावकऱ्यांच्या वर्गणीतून गोळा करण्यात आली. देवांशीची आई मीनाक्षी गावंडे यांनी यकृत दिले. तिच्यावर जुलै महिन्यात यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. आता तिला डिस्चार्ज मिळाला आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.