बांधकामाजवळ पोल्युशन रीडिंग मशीन बसवा, अन्यथा काम बंद करणार! पालिका 1200 विकासकांना नोटीस बजावणार

प्रदूषण रोखण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी पोल्युशन रीडिंग मशीन बसवा आणि प्रदूषण टाळण्यासाठी उपायोजना करा, अन्यथा काम बंद करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेने विकासकांना दिला आहे. मुंबईमध्ये पालिकेच्या अखत्यारीत असणाऱ्या 1200 विकासकांना पालिका याबाबत नोटीस बजावणार आहे. मुंबईत सध्या वाढलेले प्रदूषण आणि येणाऱ्या हिवाळ्यात प्रदूषणात होणारी वाढ लक्षात घेता पालिकेने हा इशारा दिला आहे.

मुंबईत गेल्या काही वर्षांपासून हिवाळ्यात हवेची गुणवत्ता खालावत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईत सुरू असलेल्या पाच हजारांवर बांधकामांच्या ठिकाणाहून उडणारी धूळ हे प्रदूषणाचे प्रमुख कारण असल्याचा निष्कर्ष हवामानतज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे गतवर्षी पालिकेने कठोर कारवाई करीत 15 ऑक्टोबर रोजी 27 प्रकारची नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये या वर्षी बांधकामांच्या ठिकाणी स्वयंपाक बनवण्यास, शेकोटी पेटवण्यासही बंदी घालण्यात आली आहे. यानुसार पालिकेने यानुसार पालिकेच्या वॉर्ड स्तरावर सब इंजिनीयरच्या टीमच्या माध्यमातून बांधकामांची पाहणी करून प्रदूषण नियंत्रणाची नियमावली पाळण्यात आली नसल्यास कारवाई करण्यात येत आहे.

अन्य प्राधिकरणांशी समन्वयासाठी समिती

मुंबईत सुरू असलेल्या पाच हजारांवरील बांधकामांमध्ये पालिकेच्या अखत्यारीत सुमारे 1200 बांधकामे आहेत, तर इतर बांधकामे ‘म्हाडा’, ‘एमएमआरडीए’, रेल्वे, ‘एसआरए’ आदी आस्थापनांच्या अखत्यारीत आहेत. या सर्वांमध्ये समन्वय साधण्यासाठी ‘कोऑर्डिनेशन कमिटी’ स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष पालिका आयुक्त आहेत.

अशी आहे नियमावली…

संपूर्ण बांधकाम क्षेत्र ज्यूट किंवा हिरव्या कपड्याने झाकलेले असावे, बांधकामाच्या ठिकाणी स्प्रिंक्लर असावेत, धूळ उडू नये यासाठी दिवसाला 4-5 वेळा पाण्याची फवारणी करावी.

धुळीने होणारे प्रदूषण रोखण्यासाठी एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभोवती किमान 35 फूट उंचीचे लोखंडी / पत्र्यांचे आच्छादन असावे.

रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी अ‍ॅण्टी स्मॉग मशीन लावावीत, प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी स्वतंत्र वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा बसवावी.