
>> आशीष बनसोडे
समुद्राने वेढलेल्या मुंबईच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी दंड थोपटले आहेत. किनाऱयांबरोबर खोल समुद्रातील प्रत्येक बारीकसारीक हालचालींवर करडी नजर ठेवून अनुचित घटना वेळीच रोखण्यासाठी पोलीस आपले सागरी रक्षक दल आणखी तगडे करत आहेत. पोलिसांचे हात मजबूत करण्यासाठी मोठय़ा संख्येने नागरिक रक्षक बनण्यासाठी पुढे येत आहेत.
मुंबईचा सागरी किनारा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. ‘26/11’चा दहशतवादी हल्ला समुद्रमार्गे घुसलेल्या दहशतवाद्यांनी केला होता. तेव्हापासून मुंबईच्या सागरी सुरक्षेला अधिक गंभीरतेने घेतले जाऊ लागले. सागरी गस्त तगडी करण्यासाठी काही बोटी घेण्यात आल्या. अत्याधुनिक यंत्रणांचादेखील आधार घेतला जात आहे. असे असले तरी सागरी किनारी राहणारे, प्रत्यक्षात समुद्रात मच्छिमारी करणारे, प्रवाशी बोटींचा व्यवसाय करणारे यांची साथदेखील मोलाची ठरते. हे सर्व पोलिसांसाठी कान आणि डोळ्यांचे काम करतात. त्यामुळे सागरी रक्षक दल आणखी सक्षम करण्यासाठी बंदर परिमंडळ पोलिसांनी कंबर कसली आहे.
…तर तत्काळ संपर्क
उपायुक्त विजयकांत सागर यांनी मच्छीमार, किनाऱयावरील स्थानिक रहिवाशी, बोटींचा व्यवसाय करणाऱयांशी वेळोवेळी संवाद साधून या सर्वांना पोलिसांचे हात अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. सागर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही दिवसांतच 1246 नवीन सदस्यांनी नावाची नोंद केली आहे. त्यामुळे आधीचे 549 आणि नव्याने पुढे आलेले 1246 अशा 1775 सागरी रक्षकांची फौज पोलिसांचे कान व डोळे म्हणून काम करण्यासाठी इन ऍक्शन झाले आहेत. संशयास्पद काही दिसले किंवा कानावर पडले की लगेच 112 या हेल्पलाईनवर अथवा पोलीस अधिकाऱयांना तत्काळ संपर्क साधण्यास सांगण्यात येत आहे.
सागरी किनारा भागात सजगता व सतर्कता ठेवण्यातील सागर रक्षक दल अधिक सक्षम केले जात आहे. खास मोहिमेअंतर्गत 1246 नवीन सदस्यांनी नोंद केली आहे. वेळोवेळी त्यांच्याशी बैठका घेऊन त्यांना आवश्यक सूचना केल्या जात आहेत.
विजयकांत सागर, उपायुक्त (बंदर परिमंडळ)