राज्यपाल म्हणतात, मारहाण केल्याने मराठी बोलता येईल का?

मराठी बोलता येत नाही म्हणून मारहाण केली तर मराठी बोलता येईल का, असा सवाल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज केला. राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते आज ‘महाराष्ट्र नायक’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन झाले. यावेळी बोलताना त्यांनी भाषेवरून वाद का घालायचा, असा प्रश्न उपस्थित करीत आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रात मराठी बोलले नाही तर तुम्हाला मार खावा लागेल, असे वर्तमानपत्रांतून सध्या वाचायला मिळत आहे. मी खासदार असताना तामीळनाडूतही भाषेचा असाच वाद उभा राहिला होता. तमीळ भाषा बोलता येत नसलेल्यांना काही लोक मारत होते. मात्र आता मला मराठी येत नाही म्हणून कुणी मारहाण केली तर मला लगेच घडाघडा मराठी बोलता येईल का? भाषेच्या नावावर दहशत पसरवली जात असेल तर मग महाराष्ट्रात गुंतवणूकदार येतील का? असा सवालही राज्यपालांनी केला. त्यांनी जनतेला भाषेच्या मुद्दय़ावर सहिष्णू धोरण बाळगण्याचेही आवाहन केले. कार्यकमात मंत्री गिरीश महाजन बोलत असताना मला ती भाषा येत नसल्याने त्यांच्या चेहऱयाकडे बघून ते काय बोलत असतील याचा अंदाज घेत होतो, असेही त्यांनी सांगितले. आपण अनेक भाषा शिकल्या पाहिजेत, मात्र आपण आपल्या मातृभाषेचा अभिमानही बाळगला पाहिजे. त्यात कोणतीही तडजोड करता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.