
वधू-वर सूचक संकेतस्थळावर बनावट प्रोफाईल तयार करून लग्नाचे आमिष दाखवून अश्लील चित्रीकरण केले. त्या चित्रीकरणाची भीती दाखवत आरोपीने खंडणीची मागणी केली. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी खंडणी व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार महिला माझगाव येथील रहिवाशी असून त्यांनी वधू-वर सूचक संकेतस्थळावर नोंदणी केली होती. त्यांचा प्रोफाईल पाहून आरोपीने 9 ऑगस्टला फोन करून लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर तिचा विश्वास संपादन करून आकर्षित केले. व्हिडिओ कॉल करून महिलेला गोडीगुलाबीने बोलून नग्न होण्यास सांगितले. त्याच्या भुलथापांना बळी पडत महिलेने आरोपीच्या सांगण्याप्रमाणे केले. तिचे नग्न व्हिडीओ काढून आरोपीने महिलेकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.