
पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांना सोमवारी लोकल सेवेच्या विस्कळीत वेळापत्रकाचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला. पश्चिम रेल्वेवर दिवसभरात अनेक एसी ट्रेन उशिराने धावल्या, तर रात्री मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकातील दोन प्लॅटफॉर्मवर वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी, ऐन पीक अवर्सला दोन्ही मार्गांवरील लोकल सेवेचा बोजवारा उडाला आणि घरी परतणाऱ्या नोकरदारांची प्रचंड गैरसोय झाली.
सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी उपनगरी रेल्वेच्या सेवेतील गोंधळाचा त्रास प्रवाशांना झाला. पश्चिम रेल्वेमार्गावर सकाळपासूनच अनेक एसी आणि साध्या लोकल ट्रेन विलंबाने धावत होत्या. विरारच्या दिशेने जाणाऱ्या गाडय़ांना 15 ते 20 मिनिटांचा उशीर झाला. दुपारी काही काळ सेवा पूर्वपदावर आली होती. मात्र सायंकाळी पुन्हा लोकल सेवेचे वेळापत्रक कोलमडले. चर्चगेटहून बोरिवली, विरारच्या दिशेने चाललेल्या लोकल ट्रेनची विलेपार्लेपुढील स्थानकांत रखडपट्टी झाली. रात्री नऊच्या सुमारास अनेक लोकल वेगवेगळय़ा स्थानकांत जवळपास 20 मिनिटे थांबवून ठेवल्या. विरार धिम्या लोकलने विलेपार्लेतून अंधेरी स्थानकात पोहोचण्यासाठी तब्बल 35 मिनिटे लागली. त्यापुढेही ट्रेन वारंवार थांबवण्यात आल्या. त्यामुळे घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. लोकलच्या रखडपट्टीचे नेमके कारण प्रशासनाने स्पष्ट केले नाही. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 9 आणि 10 या प्लॅटफॉर्मवरील वीजपुरवठा अचानक खंडित झाला. रात्री 9 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. यादरम्यान प्लॅटफॉर्मवर काळोख पसरल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. याचा लोकल सेवेवरही परिणाम झाला. डाऊन मार्गावरील अनेक गाडय़ांना 25 ते 30 मिनिटांचा विलंब झाल्याचे प्रवाशांनी सांगितले.