विहार तलाव मजबूत-सुरक्षित होणार

बंधाऱ्याची दुरुस्ती, टेहळणी मनोरा, संरक्षक भिंत, रस्त्याच्या बाजूला लोखंडी कठडे बसवून पवई येथील विहार तलाव लवकरच मजबूत आणि सुरक्षित करण्यात येणार आहे. या ठिकाणी होणारा समाजकंटकांचा उपद्रव, दुर्घटना, अतिक्रमणाला चाप लावण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये तलावाचे सौंदर्य वाढवण्यासाठी छोटे बगीचेही तयार केले जाणार आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलावांमध्ये पूर्व उपनगरातील पवई तलाव हा एक मुख्य जलस्रोत आहे. विहार तलावातील पाणी गाळणी संयंत्रामधून शुद्ध करून पवई निम्नस्तरीय जलाशयात पाठवण्यात येते. 41459 दशलक्ष लिटर पाणीसाठवण क्षमता असलेल्या पवई तलावातून प्रतिदिन 90 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. तलाव परिसरात साई बांगोडा हा आदिवासी पाडाही असून या ठिकाणी सामान्य जनता, वाटसरूंना जाण्यास बंदी आहे. केवळ येथील गावकऱयांना परिसरातून ये-जा करण्यास परवानगी आहे. मात्र तरीदेखील या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात समाजकंटक येत असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. शिवाय या परिसरात बेकायदा झोपडय़ा बांधल्या जात असल्याने अतिक्रमण वाढते. त्यामुळेच विहार तलाव मजबूत आणि सुरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी पालिका 26 कोटींचा खर्च करणार असून याबाबतचा प्रस्ताव आगामी महापालिकेच्या महासभेत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.

असे होणार काम

  • दगडी पिचिंग-विसर्गमार्गाची सिमेंट-काँक्रीटने दुरुस्ती
  • समाजकंटकांवर नजर ठेवण्यासाठी टेहळणी मनोरे
  • संवेदनशील ठिकाणी संरक्षक भिंत, लोखंडी जाळी
  • रस्त्याच्या कडेने सुरक्षात्मक लोखंडी कठडे
  • परिसराचे सौंदर्य जपण्यासाठी सजावटी लोखंडी जाळी
  • रस्ता दुरुस्ती, बोट उभी करण्यासाठी धक्का बांधणे
आपली प्रतिक्रिया द्या