
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी सायंकाळी ज्वलनशील प्रोपलेन गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला होता. त्यानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने सुरक्षिततेसाठी मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णतः थांबविण्यात आली. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. गेल्या 18 तासांपासून एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली असून वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत. हा एक्सप्रेस वे कधीपर्यंत सुरू होईल याबाबत आता महत्त्वाची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणारा टँकर आडोशी घाटामध्ये पलटी झाला होता. या टँकरमधून गॅस गळती होत असल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक थांबवण्यात आली होती. यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी एक लेन खुली करून दिली असली तरी अद्यापही एक्सप्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळे हजारो प्रवासी या ठिकाणी अडकले आहेत.
पुणे-मुंबई दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक अजूनही बंद आहे. आणखी काही तास वाहतूक कोंडी असेल. टॅंकरमधून अजूनही विषारी गॅस गळती सुरू आहे. महामार्ग एसपी तानाजी चिखले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ पलटी झालेल्या टँकरमधून गॅस गळती वाढली आहे. त्यामुळे मुंबई लेन पूर्णपणे बंद करण्यात आलेली असून पुणे लेनवर खालापूर टोल प्लाझापर्यंत दहा ते बारा किलोमीटर वाहतूक कोंडी झालेली आहे. ही गॅस गळतीच्या समस्येचा तोडगा काढेपर्यंत वाहतूक कोंडी राहणार असून पुण्यावरून मुंबईकडे येणारी वाहतूक ताम्हिणी घाटामार्गे आणि कर्जतमार्गे ठाण्याकडे सुरू केली तर फायदा होईल. कारण ही वाहतूक कोंडी आणखी काही काळ राहण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे 18 तासांपासून बंद; वाहनांच्या 12 किलोमीटरपर्यंत रांगा, पोलिसांनी दिली मोठी माहिती, नवीन पर्यायी मार्गही सांगितला. #MumbaiPuneHighway pic.twitter.com/TsdHH4zbPC
— Saamana Online (@SaamanaOnline) February 4, 2026
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वाहतूक मार्गात बदल
आडोशी बोगद्याजवळील गॅस गळतीच्या घटनेमुळे एक्सप्रेस वे आणि जुना हायवे दोन्ही ठप्प आहेत. प्रवाशांनी ताम्हिणी घाट मार्गाने पुणे → पौड → ताम्हिणी घाट → माणगाव → मुंबई. (दक्षिण मुंबईसाठी उपयुक्त) आणि माळशेज घाट मार्गाने पुणे → चाकण → नारायणगाव → माळशेज घाट → कल्याण/ठाणे. (उपनगरांसाठी उपयुक्त) या पर्यायी मार्गांचा वापर करावा अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. लोणावळा-खंडाळा मार्ग पूर्णपणे टाळावा, असेही प्रशासनाने म्हटले असून नव्या मार्गामुळे प्रवासाचा वेळ 3 ते 5 तासांनी वाढू शकतो, असेही सूचित करण्यात आलेले आहे.




























































