
लोकल ट्रेनने दररोज दाटीवाटीने प्रवास करणारे लोकल प्रवाशीही आता हायटेक झाले आहेत. मध्य रेल्वेने प्रवास करणाऱया एकूण प्रवाशांपैकी तब्बल 9 लाख 61 हजार प्रवाशी तिकीट खिडकीवर रांग न लावता चक्क मोबाईलद्वारे तिकीट काढत असल्याचे समोर आले आहे.
मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलने दररोज सुमारे 40 लाखांहून अधिक मुंबईकर प्रवास करतात. त्यामुळे तिकीट काढण्यासाठी सर्वच रेल्वे स्थानकांत प्रवाशांच्या भल्यामोठय़ा रांगा असतात. सदरची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने एटीव्हीएम मशीनसोबतच मोबाईल (यूटीएस अॅप) तिकिटांचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध करून दिला आहे. तसेच नुकतेच यूटीएस अॅपमध्ये सुसूत्रता आणल्याने मोबाईलच्या माध्यमातून काढल्या जाणाऱया तिकिटांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे.
1 जानेवारी ते 26 मे दरम्यान मोबाईल आणि एटीव्हीएम मशीन्सद्वारे मध्य रेल्वेच्या एकूण प्रवाशांच्या 25.23 टक्के प्रवाशांनी तिकीट काढले आहे. त्यामुळे तिकीट खिडकीवरील रांगा कमी होत आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मोबाईल तिकीट काढण्याचे प्रमाण वाढले असून गेल्या पाच महिन्यांत तब्बल 13 कोटी 93 लाख प्रवाशांनी मोबाईलद्वारे तिकीट काढले असून प्रतिदिन हे प्रमाण 9लाख 61 हजार एवढे आहे.