लोकलमधील ‘फटका टोळी’वर पोलिसांची करडी नजर, पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील जवळपास 60 ठिकाणे धोकादायक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकल व मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटना तसेच ‘फटका टोळी’चा वाढता उपद्रव रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) विशेष सतर्कता बाळगली आहे. पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावरील जवळपास 60 धोकादायक ठिकाणांवर पोलीस करडी नजर ठेवणार आहेत. दगडफेक करणारे आणि फटका टोळीच्या सदस्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जीआरपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मध्य रेल्वेवरील लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात बुरखाधारी तरुणाने घुसखोरी केली. त्यानंतर पोलिसांनी प्रवाशी सुरक्षेसाठी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. मध्य रेल्वेवर कुर्ला परिसरात तसेच ठाण्यापुढील मार्गावर दगडफेकीच्या घटना अधूनमधून घडतात. पश्चिम रेल्वेवर वांद्रे, माहीम, कांदिवली, राम मंदिर, बोरिवली आदी भागांत फटका टोळी व दगडफेक होण्याची शक्यता अधिक असते. दोन्ही मार्गांवरील धोकादायक 60 ठिकाणांची ओळख रेल्वे पोलिसांनी पटवली आहे. प्रवाशी सुरक्षेला उच्च धोका असलेल्या त्या भागांवर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. रेल्वे रुळालगतचे कमी प्रकाश असलेले भाग, दाट झुडपे, पुलांच्या खांबाजवळ फटका टोळीचे लोक दबा धरून बसतात. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक गेटवरच्या प्रवाशांना टार्गेट करतात. त्यांना रोखण्यासाठी नव्या पद्धतीने कारवाई करणार आहोत. असुरक्षित भागांत सुरक्षा कर्मचारी दोन पाळ्यांमध्ये पहारा देतील, अशी माहिती जीआरपीच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. गर्दीच्या वेळेत गेटवरील प्रवाशांना अधिक धोका असतो. त्यानुसार कारवाईची व्यूहरचना आखली जाणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या तुलनेत ‘मरे’वर अधिक धोका

उपनगरी रेल्वे मार्गावरील 60 असुरक्षित ठिकाणांपैकी 39 ठिकाणे मध्य रेल्वेच्या हद्दीतील असून 21 ठिकाणे पश्चिम रेल्वेच्या हद्दीत आहेत. पूर्वी दरवर्षी फटका टोळीची 80 ते 85 प्रकरणांची नोंद होत असे. गेल्या वर्षी केवळ 12 घटना घडल्या. तथापि, फटका टोळीकडून होणारे हल्ले आणि दगडफेकीची एकही घटना घडता कामा नये, यादृष्टीने असुरक्षित भागांत कारवाईची विशेष मोहीम राबवली जात असल्याचे रेल्वे पोलिसांनी म्हटले आहे.