Mumbai Rain – विक्रोळीत दरड कोसळून एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू, दोन जखमी

फाईल फोटो

मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून पूर्व उपनगरातील विक्रोळी येथे मोठी दुर्घटना घडली आहे. विक्रोळीतील पार्कसाईट भागातील वर्षानगर येथील डोंगराळ भागात असणाऱ्या जनकल्याण सोसायटीवर शनिवारी दरड कोसळली. यात एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने मुंबई महानगरपालिकेच्या हवाल्याने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळीतील वर्षानगर या डोंगराळ भागात असणाऱ्या जनकल्याण सोसायटीमध्ये राहणाऱ्या मिश्रा कुटुंबाच्या घरावर शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास दरड कोसळली. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि मुंबई महापालिकेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बचवाकार्य सुरू केले.

दगड-मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मिश्रा कुटुंबाला बाहेर काढण्यात आले. मात्र या दुर्घटनेत सुरेश मिश्रा (वय – 50) आणि शालू मिश्रा (वय – 19) या बाप-लेकीचा मृत्यू झाला, तर आरती मिश्रा (वय – 45) आणि ऋतुराज मिश्रा (वय – 20) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी भरले असून लोकल सेवेवरही याचा परिणाम झाला आहे. रेल्वे ट्रॅकवर पावसाचे पाणी साचल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. अशातच मुंबई पोलिसांनी ट्विट करत नागरिकांना आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईची लाइफलाइन कोलमडली; मध्य, हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांना मनस्ताप

सध्या मुंबई मध्ये सुरू असलेला संततधार पाऊस व हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या अनुषंगाने नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर जाणे टाळावे. तसेच समुद्रकिनारी व सखल भागात जाणे टाळा. पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून मुंबई पोलीस सतर्क व मुंबईकरांच्या मदतीसाठी तत्पर आहेत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास १०० / ११२ / १०३ डायल करा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

आज कोणत्या जिल्ह्याला ऑरेंज आणि रेड अलर्ट?

  • पालघर – यलो अलर्ट
  • ठाणे – ऑरेंज अलर्ट
  • मुंबई – रेड अलर्ट
  • रायगड – रेड अलर्ट
  • रत्नागिरी – ऑरेंज अलर्ट
  • सिंधुदुर्ग – यलो अलर्ट