मुसळधार पावसामुळे लांब पल्ल्याच्या ‘या’ गाड्या रद्द, वाचा बातमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांवर विपरीत परिणाम झाला आहे. या पावसामुळे मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. लांब पल्ल्याच्या गाड्यांबाबत बोलायचे झाल्यास गुरुवारी मुंबईहून निघणारी ‘तपोवन एक्स्प्रेस’ तसेच बुधवारी दादरहून निघणारी जनशताब्दी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

गुरुवारी जालन्याहून दादरला येण्यासाठीची जनशताब्दी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. बुधवारी निघालेली नांदेड ते मुंबई तपोवन एक्स्प्रेस ही नाशिक रोडपर्यंतच पोहोचली होती. नाशिक रोड ते मुंबईदरम्यान ती रद्द करण्यात आली. मुंबई ते नागपूर ही नंदीग्राम एक्स्प्रेस मुंबई ते मनमाडदरम्यान रद्द करण्यात आली आहे. तर नागपूर ते मुंबई ही बुधवारी संध्याकाळी निघालेली नंदीग्राम एक्स्प्रेस मनमाडपर्यंतच धावणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते नांदेड गाडी ही बुधवारी दुपारी बारा वाजता सुटणार होती.ही गाडी पावसामुळे सायंकाळी सहा वाजता सुटली. मुंबई ते सिकंदराबाद ही छत्रपती शिवाजी टर्मिनसरून रात्री नऊ वाजता निघणारी देवगिरी एक्स्प्रेस मध्यरात्री १२.४५ वाजता सुटणार आहे.  पावसामुळे काही गाड्या पूर्णत: तर काही गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्याचे दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क  विभागाने कळविले आहे.

मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प झाल्याने कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या चार  गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या खालील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

  • CSMT- रत्नागिरी (01033) , बुधवारी रद्द करण्यात आली
  • रत्नागिरी-पनवेल (01034),बुधवारी रद्द करण्यात आली

दादर रत्नागिरी पॅसेंजर (50103 )दिवा स्थानकातून सुटेल

मत्स्यगंधा एक्सप्रेस 3.40 तास उशिराने सुटणार असून आता ती सायंकाळी 7 वाजता सुटेल

गुरुवारी रद्द करण्यात आलेल्या गाड्या

  • पनवेल – सावंतवाडी (01035 )
  • सावंतवाडी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (01034 )