खूशखबर… मुंबईकरांची पाणी चिंता मिटली

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात सध्या धुवाधार पाऊस कोसळत असून तब्बल 982413 दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे. विशेष म्हणजे गतवर्षी 7 जुलै रोजी फक्त 14 टक्के जलसाठा शिल्लक होता. तर या वर्षी सातही तलावांत 67.88 टक्के जलसाठा जमा झाला आहे. हे पाणी गतवर्षीच्या तुलनेत 54 टक्क्यांनी जास्त असून गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक साठा आहे. हा जलसाठा पुढील वर्षी मार्चपर्यंत पुरणारा आहे.

मुंबईला मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज 3 हजार 850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत 1 ऑक्टोबर रोजी 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाणी जमा होणे गरजेचे असते. या साठ्यानुसार मुंबईच्या वर्षभराच्या पाणी पुरवठय़ाचे नियोजन केले जाते. तलावांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत 54 टक्के जादा पाणी जमा

सध्याचा जलसाठा

  • अप्पर वैतरणा 166150 दशलक्ष लिटर 73.74 टक्के
  • मोडकसागर 112206 दशलक्ष लिटर 87.03 टक्के
  • तानसा 105764 दशलक्ष लिटर 72.90 टक्के
  • मध्य वैतरणा 168801 दशलक्ष लिटर 90 टक्के
  • भातसा 412813 दशलक्ष लिटर 57.57 टक्के
  • विहार 13042 दशलक्ष लिटर 47.09 टक्के
  • तुळसी 3637 दशलक्ष लिटर 45.20 टक्के

‘मध्य वैतरणा’ काठोकाठ, तीन दरवाजे उघडले

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया धरणांतील महत्त्वाचे आणि मोठे धरण असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणामध्ये 90 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तलाव क्षेत्रात होणाऱया जोरदार पावसामुळे या धरणाच्या तीन दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.