क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मुंबईसह हिंदुस्थानातील क्रिकेटमध्ये सुधारण्यासाठी पुढाकार घेणाऱया सचिन तेंडुलकर याने मंगळवारी दुलीप ट्रॉफीमध्ये संघभावनेची कमतरता दिसून येते. यामध्ये सुधारणा होण्याची गरज असून बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली याने याकडे लक्ष द्यायला हवे, असे स्पष्ट मत व्यक्त करताना देशातील महत्त्वाच्या स्पर्धेत खेळाडू एकसंघ म्हणून खेळताना दिसत नसल्याचे प्रत्यक्षपणे सांगितले आहे.
दुलीप ट्रॉफीमध्ये सहभागी होताना खेळाडू वैयक्तिक कामगिरीवर लक्ष देतात. तसेच आगामी काळांतील स्पर्धा डोळ्यांसमोर ठेवून आपला खेळ करतात. आयपीएल लिलाव, टी-20 किंवा वन डे यांसारख्या स्पर्धांमध्ये संघांचे प्रतिनिधित्व करायला मिळावे यासाठी खेळाडू प्रयत्न करीत असतात, पण दुलीप ट्रॉफीत खेळाडू संघांसाठी खेळताना दिसत नाही. ही स्पर्धा सांघिक खेळासाठी ओळखली जात आहे. त्यामुळे यामध्ये बदल आवश्यक आहे, असे सचिन तेंडुलकर यावेळी आवर्जून म्हणाला.
सहा संघांमध्ये ही स्पर्धा व्हायला हवी
दुलीप ट्रॉफी स्पर्धा रणजी स्पर्धा आटोपल्यानंतर आयोजित करायला हवी. या स्पर्धेत रणजी स्पर्धेत सेमी फायनलमध्ये सहभागी झालेले चार संघ व अंतिम चारपर्यंत पोहचू न शकलेल्या संघांतील अंडर 19 व अंडर 23 मधील गुणवत्ताप्रधान खेळाडू असलेले दोन संघ अशा एकूण सहा संघांमध्ये ही स्पर्धा व्हायला हवी असे सचिन तेंडुलकरला वाटते.

























































