
मुंबईत नायगाव, ना. म. जोशी मार्ग, वरळीतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास होत आहे. पण बीपीटीच्या जागेवरील शिवडीतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास रखडला आहे. या चाळींची अवस्था अतिशय वाईट आहे. पाणीपुरवठा, मलनिस्सारण असे अनेक प्रश्न आहेत. रहिवासी 160 चौरस फुटांच्या घरात राहत आहेत. गुरांचा गोठा परवडला, पण बीडीडी चाळी नको अशी परिस्थिती आहे. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा केंद्राकडे पाठपुरावा करण्यासाठी एका अधिकाऱयाची नियुक्ती करण्याची मागणी शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी आज विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत केली. त्याचबरोबर त्यांनी परळच्या हाफकिन कर्मचाऱयांच्या वसाहती तसेच शिवडी, काळाचौकी व ना. म. जोशी मार्गावरील पोलीस वसाहतींच्या दुरवस्थेकडेही लक्ष वेधले.
























































