‘मुंबई श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा आजपासून; अंधेरीत रंगणार खेळाडूंमध्ये चुरस

435

अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे शुक्रवारी प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱया ‘स्पार्टन मुंबई श्री’ या शरीरसौष्ठव स्पर्धेला सुरुवात होणार आहे. बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना व मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटना यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येणाऱया या स्पर्धेत 12 गटांमध्ये शरीरसौष्ठवपटू सर्वस्व पणाला लावतील. ‘मुंबई श्री’ ही जिल्हास्तरीय स्पर्धा असूनही एकाच मंचावर अडीचशेपेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणारी ही एकमेव स्पर्धा म्हणून ओळखली जाते. 28 फेब्रुवारीला सायंकाळी 4 वाजल्यापासूनच स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू होईल. गेली काही वर्षे ‘स्पार्टन मुंबई श्री’ होण्याचे स्वप्न पाहणारे भास्कर कांबळे, सुशील मुरकर, उमेश गुप्ता, नीलेश दगडे, दीपक तांबीटकर, सुशांत रांजणकरसारखे फॉर्मात असलेले खेळाडू पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. प्राथमिक फेरीतून पात्र ठरणारे खेळाडू उद्या शनिवारी लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील सेलिब्रेशन स्पोर्टस् क्लबच्या मंचावर उतरतील.

गतवर्षी सुशील मुरकरकडे संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात होते. त्या दिशेने झेप घेताना त्याने पाच स्पर्धाही जिंकल्या होत्या, पण स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत त्याची गाठ अनपेक्षितपणे आलेल्या अनिल बिलावाशी पडली आणि सुशीलचे स्वप्न गटातच भंगले. गेल्या वेळच्या पराभवाचे दुःख विसरून तो पुन्हा सज्ज झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या