मुंबईत भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला, दोन वर्षांत दीड लाख लोकांचा घेतला चावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील काही भागांमध्ये रात्री भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला असून जानेवारी 2020 ते नोव्हेंबर 2021 या दोन वर्षांत तब्बल 1 लाख 20 हजार 196 जणांचा कुत्र्यांनी चावा घेतला आहे. हे कुत्रे प्रामुख्याने रात्रपाळी करणारे कर्मचारी, कचरावेचक, दुचाकीस्वार, लहान मुलांवर हल्ला करतात. त्यामुळे मुंबईकरांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.

मुंबईत रात्रीच्या वेळी रस्त्यावरुन जाताना भटक्या कुत्र्यांचा सामना करावा लागतो. दुचाकीस्वार रस्त्यावरून जात असताना वाहनचालकांच्या मागे भटके कुत्रे लागतात तर लहान मुलांच्या अंगावर धावून जातात. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी निर्बिजीकरण व रेबीज लसीकरण वाढवण्यावर जोर दिला जात असून दोन वर्षांत 33 हजार 166 कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले.

भटक्या कुत्र्यांचे निबिर्जीकरण करण्यासाठी 7 संस्थांची निवड केली असून निबिर्जीकरणानंतर आहे त्या भागातच पुन्हा कुत्र्याला सोडण्यात येते, अशी माहिती देवनार पशुवैद्यकीय विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. के. ए. पठाण यांनी दिली.

कुत्र्यांची गणना दर 10 वर्षांनी

मुंबई महापालिकेकडून दर 10 वर्षांनी भटक्या कुत्र्यांची आकडेवारी गोळा केली जाते. 2014 ला आकडेवारी गोळा करण्यात आली असून आता 2024 साली आकडेवारी गोळा केली जाणार आहे. महापालिकेने 2014 मध्ये भटक्या कुत्र्यांची आकडेवारी गोळा केली त्यावेळी भटक्या कुत्र्यांची संख्या 2 लाख 96 हजार 221 इतकी होती.

न्यायालयाच्या निर्देशानुसार निर्बीजीकरण

भटक्या कुत्र्याची एक मादी 4 पिलांना जन्म देते. त्यामुळे मुंबईत कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर, न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय प्राणी कल्याण मंडळाने घालून दिलेल्या निर्देशांनुसार, वर्षाला 30 टक्के भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करून भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवले जाते.