न्यूझीलंडमध्ये टाउपॉ सरोवरात बुडून हिंदुस्थानी तरुणाचा मृत्यू; पवईतील श्रीराम कुटुंबावर शोककळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यूझीलंडमधील टाउपॉ सरोवरात एका 21 वर्षीय हिंदुस्थानी तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शौर्य श्रीराम असे या मृत मुलाचे नाव असून, तो न्यूझीलंडच्या ऑकलंड विद्यापीठात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. 5 एप्रिल रोजी इस्टरच्या सुट्टीत मित्रांसोबत फिरण्यासाठी अ‍ॅकेशिया बे येथील व्हाकामोएंगा पॉईंटवर गेला असता  ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शौर्य इस्टरच्या सुट्टीत मित्रांसोबत फिरण्यासाठी अ‍ॅकेशिया बे येथील व्हाकामोएंगा पॉईंटवर गेला होता. मित्रांसोबत असताना अचानक खोल पाण्यात गेला आणि तिथेच तो धडपडू लागला. त्याच्या एका मित्राने त्याला तातडीने किनाऱ्यावर खेचून आणले आणि मदतीसाठी आपत्कालीन सेवांना पाचारण केले. मदत मिळेपर्यंत मित्रांनी त्याला वाचवण्याचे अथक प्रयत्न केले. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेले प्रथमोपचारक आणि रोटोरुआ रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने शौर्यला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. काही वृत्तांनुसार, मदत पोहचण्यापूर्वीच शौर्यचा पाण्यात बेशुद्ध होऊन मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

शौर्य हा सनी आणि सुधा श्रीराम यांचा एकुलता एक मुलगा होता. श्रीराम कुटुंब दोन दशकांहून अधिक काळ न्यूझीलंडमध्ये वास्तव्यास होते, त्यानंतर ते मुंबईतील पवई परिसरात स्थायिक झाले. एकुलत्या एका मुलाच्या निधनामुळे आईची अवस्था अत्यंत वाईट असून, वडीलही आजारी असल्याचे समजते. कुटुंबाला सावरण्यासाठी मेलबर्नहून त्यांचे नातेवाईक न्यूझीलंडला रवाना झाले आहेत. ऑकलंडमधील हिंदुस्थानचे महावाणिज्यदूत मदन मोहन सेठी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत शौर्यचा मृतदेह हिंदुस्थानात पाठवण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

शौर्यचा मृतदेह मायदेशी आणण्यासाठी सुमारे 18 हजार डॉलर्स इतका मोठा खर्च अपेक्षित आहे. या संकटकाळात श्रीराम कुटुंबावर मोठे आर्थिक ओझे पडले असून, त्यांना मदत करण्यासाठी न्यूझीलंडमधील हिंदुस्थानी समुदाय आणि हितचिंतक पुढे आले आहेत. शौर्यचा मृतदेह सन्मानाने हिंदुस्थानात परत आणता यावा यासाठी समाजबांधवांकडून निधी उभारणीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

Tools