
सामना प्रतिनिधी। मुंबई
बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर बहिष्कार टाकणाऱया ज्युनियर कॉलेज शिक्षकांच्या विविध मागण्यांवर आज मंगळवारी शालेय शिक्षण आणि वित्तमंत्र्यांसोबत बैठक होणार असून या बैठकीत तरी शिक्षकांच्या मागण्यांवर निर्णय न झाल्यास बारावीच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
अर्थखात्याशी संबंधित शिक्षकांच्या मागण्या अद्याप प्रलंबित आहेत.सोमवारी फिजिक्स, सेक्रेटरियल प्रॅक्टिस, पॉलिटिकल सायन्स या विषयांच्या परीक्षा झाल्या. राज्य शिक्षण मंडळात या विषयाच्या मुख्य मॉडरेटर्सच्या बैठकादेखील पार पडलेल्या नाहीत. त्यामुळे तपासणीविना पडून राहिलेल्या उत्तरपत्रिकांची संख्या सुमारे 45 लाखांवर गेली आहे. उद्या मंगळवारी वित्तमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्र्यांसोबत टीचर्स असोसिएशनची संयुक्त बैठक होणार असून या बैठकीत निर्णय होण्याची अपेक्षा टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी व्यक्त केली.
दहावी, बारावीच्या शिक्षकांना निवडणूक कामांतून वगळा
शिक्षकांच्या असहकार आंदोलनामुळे आधीच बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात झालेली नाही. त्यातच मार्च-एप्रिलमध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या कामांत दहावी, बारावीचे शिक्षक अडकले तर यंदा दोन्ही निकालांचे काही खरे नाही अशी परिस्थितीच निर्माण होणार आहे. त्यामुळे दहावी, बारावीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याची मागणी टीचर्स असोसिएशनने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

























































