
खासगी तेजस एक्प्रेस चालविण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता रेल्वे मंत्रालयाने मुंबईतून तब्बल 26 खासगी ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेन चालविण्यासाठी अर्थ मंत्रालयाच्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ऍप्रिशीयल कमिटीने (पीपीपीएसी) या निर्णयास हिरवा कंदील दाखविला असून दहा ते पंधरा दिवसांत खासगी ट्रेनसाठी निविदा मागविण्यात येणार आहेत.
रेल्वेला तोटय़ातून बाहेर काढून तिचे संपूर्ण पुनर्घटन करण्यासाठी सरकारने तयारी चालू केली आहे. देशातील सर्वात मोठा रोजगार पुरविणाऱया रेल्वे मंत्रालयाने प्रथमच आपली पॅसेंजर ट्रेन चालविण्याची एकाधिकारशाही मोडून टाकीत तब्बल 100 मार्गांवर 150 खासगी ट्रेन चालविण्याची योजना आखली आहे. अर्थ मंत्रालयाच्या ‘पीपीपीएसी’ कमिटीने खासगी ट्रेन चालविण्याचा प्रस्ताव 19 डिसेंबर रोजीच मंजूर केल्याने आता केवळ औपचारिकता बाकी आहे. अन्य महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या मार्गात मुंबई-कोलकाता, मुंबई-गुवाहटी, नवी दिल्ली-मुंबई, नवी दिल्ली-कोलकाता, नवी दिल्ली-बंगळुरू, नवी दिल्ली-चेन्नई, कोलकाता-चेन्नई आणि चेन्नई-जोधपूर अशा मार्गांचा समावेश असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. तसेच काही नवी दिल्ली ते पाटणा, अलाहाबाद, अमृतसर, चंदिगड, कटरा, गोरखपूर, छपरा आणि भागलपूर अशा मार्गांचीदेखील निवड झाली आहे.
या 100 मार्गावर 150 प्रायव्हेट ट्रेन
प्रायव्हेट ट्रेनसाठी निवडलेल्या 100 मार्गांपैकी 26 मार्ग देशाची आर्थिक राजधानी मुंबईशी जोडलेले असतील तर 35 मार्ग नवी दिल्लीशी, 12 मार्ग कोलकाताशी, 11 चेन्नई आणि 8 बंगळुरू अशा मेट्रो शहरांशी जोडलेले रेल्वे मार्गांचे खाजगीकरण होणार आहे. तर काही नॉन मेट्रो मार्गांचाही समावेश होण्याची शक्यता असून त्यात गोरखपूर-लखनौ, कोटा-जयपूर, चंदिगड लखनौ, विशाखापट्टणम-तिरुपती आणि नागपूर-पुणे या मार्गांचा अंतर्भाव आहे.
या खासगी ट्रेन मुंबईतून धावणार
मुंबई ते पुणे, मुंबई ते नागपूर, नागपूर ते पुणे, मुंबई ते चेन्नई, मुंबई-वाराणसी, मुंबई-लखनौ, पुणे-पाटणा, चेन्नई-कोईम्बतूर, चेन्नई-सिकंदराबाद, सुरत-वाराणसी, भुवनेश्वर-कोलकाता आदी मार्गांवर खासगी ट्रेन धावणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोदकुमार यादव यांनी रेल्वेने प्रायव्हेट ट्रेनचे मार्ग निश्चित केल्याचे म्हटले असून येत्या दहा ते पंधरा दिवसांत त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.























































