मुंबईला हुडहुडी भरली… राज्यभर गारठा वाढणार

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात 8 डिसेंबरपासून पारा 17 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरणार असल्याने थंडीची लाट येणार आहे. ही स्थिती पुढील आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबई, महाराष्ट्रात ऑक्टोबरपर्यंत झालेल्या पावसामुळे थंडी गायब होती. काही दिवस दिवसा उकाडा आणि रात्री गारठा अशी स्थिती होती. मात्र आता पारा कमालीचा घसरण्यास सुरुवात झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडी वाढली असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. तर हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार 7 ते 11 डिसेंबरपर्यंत देशभरात थंडीची लाट येणार आहे. मध्य प्रदेश, विदर्भात तापमानात मोठी घट होणार आहे. थंडीसह सरासरी तापमान कमी होऊन धुके दाटण्याची शक्यता असल्याने दृश्यमानता कमी होणार आहे.

z उत्तर हिंदुस्थानात तापमान घटल्याने थंडीची लाट आली आहे. जम्मू-कश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी होत आहे तर दिल्लीपासून पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश व राजस्थानसाठी थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या राज्यांमध्ये तापमान 4 अंशांपर्यंत घटण्याचा अंदाज आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मुंबईसह महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे. यामुळे तापमान 17 ते 18 अंश सेल्सिअसपर्यंत नोंद होण्याचा अंदाज आहे. – सुष्मा नायर, आयएमडी