
सामना प्रतिनिधी । मुंबई
बंद घरे, दुकाने, बँकांना लक्ष्य करायचे सोडून दरोडेखोर, चोरांनी आता मंदिरांना आपल्या हिटलिस्टवर आणले आहे. कमकुवत सुरक्षा व्यवस्था, देवांबाबत नसलेली आस्था, चोरी करणे सहज शक्य होत असल्यामुळे दरोडेखोरांनी मंदिरांमध्ये लुटमार करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवडाभरात चोरांनी मुंबईसह विविध ठिकाणच्या मंदिरांमधील दानपेटय़ा फोडून रोकड तसेच देवांचे सोन्याचांदीचे अलंकार चोरून नेल्याच्या घटना घडल्यामुळे मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गेल्याच आठवडय़ात शिवाजी पार्क आणि घाटकोपर पोलिसांनी फक्त मंदिरांमध्ये चोऱया करणाऱया सराईत चोरांच्या मुसक्या आवळल्या. त्या चोरांविरोधात मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत देवळातील चांदीच्या मूर्ती, मौल्यवान दागिने चोरल्याचे गुन्हे दाखल आहेत. शिवाजी पार्क पोलिसांनी पकडलेला रमेश परुळेकर (42) हा नशेबाज आणि जुगारी आहे. अय्याशी करण्यासाठी तो मंदिरांमध्ये चोऱया करतो. त्याने दादरच्या एका जैन मंदिरातून मुनीसुरतनाथ देवाची चांदीची मूर्ती चोरून नेली होती. शिवाय ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतदेखील त्याने मंदिरातील सोन्याचांदीचे दागिने, देवाचा मुकुट, दानपेटीतील पैसे चोरले होते, तर घाटकोपर पोलिसांनी नरेश जैन (40) याला पकडले. नरेश हा स्वतः जैन समाजाचा असून तो केवळ जैन मंदिरांमध्येच चोऱया करतो. हे दोघे चोर पोलिसांच्या हाती लागले असतानाच ठाण्याच्या वजेश्वरी मंदिरात दरोडा टाकून चोरांनी 12 लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. त्याचवेळी कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या खजिन्यावर दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी देवीचे मौल्यवान अलंकार, प्राचीन नाणी आणि वस्तू चोरून नेल्या. या घटना ताज्या असतानाच दोन दिवसांपूर्वी शहापूरच्या लक्ष्मीनारायण मंदिराला चोरांनी टार्गेट केले. चोरांनी मंदिरातील दोन दानपेटय़ा फोडून 17 हजारांचा ऐवज लंपास केला. दोन मंदिरांत लुटमार करणाऱया दरोडेखोरांचा थांगपत्ता अद्याप लागलेला नाही.
चोरांचा डोळा मंदिरांवरच का?
बंद घरे शोधून त्या घरांना लक्ष्य केले जायचे. चोरटे बंद दुकानाचे शटर उचकटून लुटमार करायचे. बँका, कंपन्यांमध्येही चोरी करायचे, पण या ठिकाणी चोरी करणे आता अवघड ठरू लागल्यामुळे चोरांनी आपला मोर्चा मंदिरांकडे वळवला आहे. मंदिरांत सुरक्षाव्यवस्था म्हणावी तितकी तगडी नसते. पुजारी किंवा एखादा सुरक्षा रक्षक असेल तर त्याला शस्त्राचा धाक दाखवला की काम फत्ते, मंदिरांमध्ये रेकी करणे सहज शक्य असते. त्यामुळे मंदिर सॉफ्ट टार्गेट ठरू लागली आहेत. त्यातच चोरटे हे कुठल्याही समाजाचे असो, त्यांच्यात देवांबद्दल श्रद्धा राहिली नसून केवळ झटपट पैसा कमावणे हेच त्यांचे लक्ष्य बनले आहे. त्यामुळे दरोडेखोरांना मंदिरांमध्ये हात साफ करताना भीती वाटत नाही, असेही एका पोलीस अधिकाऱयाने सांगितले.
मंदिरेच टार्गेट का होताहेत?
मंदिरांना तगडी सुरक्षा व्यवस्था नसते. देवळांमधील गाभारा आणि भिंती उंच व मजबूत नसतात. सीसीटीव्ही बसवलेले असले तरी ऍलर्ट अलार्म नसणे व बऱयाचदा देवळात पुजारी नसणे हीच बाब चोरटय़ांच्या पथ्यावर पडते. त्यामुळे या बाबींकडे मंदिर ट्रस्टीने गंभीरपणे पाहणे अत्यावश्यक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने काही बाबींचा अवलंब केल्यास मंदिरांमधील चोऱया रोखता येऊ शकतील, असेही त्या अधिकाऱयाने सांगितले.
























































