नायर रुग्णालय रॅगिंग प्रकरण-पायल तडवीच्या आत्महत्येनंतर तीन वरिष्ठ महिला डॉक्टर गायब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 सामना प्रतिनिधी । मुंबई

नायर रुग्णालयातील डॉक्टर पायल तडवी हिच्या आत्महत्येनंतर तीन महिला डॉक्टर हॉस्पिटलमधून गायब झाल्याचे पुढे आले आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पायलने जीवन संपवले. पायलच्या आत्महत्येनंतर तीन डॉक्टर गायब झाल्यामुळे संशयाची सुई त्यांच्याकडे वळली आहे. पोलिसांनी या तीन डॉक्टरांचा शोध सुरू केला आहे.

मुंबई सेंट्रल येथील टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दुसऱया वर्षात शिकणाऱया पायल तडवीने नायर रुग्णालयातील वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या केली. रुग्णालयातील तीन वरिष्ठाच्या जाचाचा कंटाळून पायलने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. पायल ही स्त्रीरोगतज्ञ पदव्युत्तर पदवीच्या दुसऱया वर्गात शिकत होती. बारावी तसेच नीटमध्ये चांगले गुण मिळाल्याने पायलची अनुसूचित जातीच्या आरक्षित जागेवर निवड झाली होती. या रागातून तीन वरिष्ठ महिला डॉक्टर पायलला हिणवत होत्या असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी 22 जणांची चौकशी केली असून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज आणि पायलचा मोबाईलही ताब्यात घेतला आहे.

तीन डॉक्टर गायब
या त्रासाची कल्पना पायलने आपल्या नातेवाईकांना व रुग्णालयातील युनिट हेड व खातेप्रमुखांना दिली होती पण त्याची दखल खातेप्रमुखांनी घेतली नाही. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी कसून चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी पायलच्या खोलीतील सहकारी, स्त्री रोग विभागातील सहकाऱयांची चौकशी सुरू केली आहे. या चौकशीनंतर तीन वरिष्ठ महिला डॉक्टर गायब झाल्या आहेत. त्यामुळे या तीन महिला डॉक्टरांवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी या महिला डॉक्टरांचा शोध सुरू केला आहे.

विभागप्रमुखांना नोटीस

मानसिक त्रासाची कल्पना देऊनही कारवाई न करणारे विभागप्रमुख डॉ. चिगलिंग, युनिट हेड यांना डीन डॉ. रमेश भार्मल यांनी कारणे दाखवा नोटीस दिली आहे.

कायदा कठोर करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणानंतर कायद्यात दुरुस्ती करून कायदा कठोर करण्यासाठी राज्य सरकारने त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, पालिकेच्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू दिलीप म्हैसकर यांचा समावेश आहे. ही समिती या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून आठ दिवसांत अहवालही सादर करेल.

प्रशासनाला जाग आली

पायलच्या आत्महत्येनंतर रुग्णालय प्रशासनाला जाग आली आहे. एखाद्या डॉक्टरची वरिष्ठ डॉक्टरने त्रास दिला तर थेट रुग्णालयाच्या डीनकडे तक्रार करण्यास सांगितले आहे. तसेच डॉक्टरांची दर सहा महिन्यांनी मानसिक व शारीरिक आरोग्याची तपासणी होणार आहे. रुग्णालयातील कामाचा ताण, कामाचे तास व घरच्या अडचणींमुळे डॉक्टर तणावाखाली असतात. त्यामुळे या डॉक्टरांचे समुपदेशन करण्याचा निर्णय डॉ. रमेश भार्मल यांनी घेतला आहे.

10 तारीखला तक्रार करूनही अधिष्ठातांचे दुर्लक्ष

पायल तडवीच्या मानसिक छळाची लेखी तक्रार पायलच्या आईने 10 मे रोजी नायरच्या अधिष्ठातांकडे केली होती. आपण आदिवासी असल्याने रुग्णालयात प्रवेश घेतल्यापासूनच आपल्या मुलीला जातिवाचक टोमणे मारणे, रुग्णांसमोर अपमान करणे, ‘हाकलून देणार’, ‘प्रॅक्टिस करू देणार नाही’ अशा धमक्या देणे, व्हॉटस्ऍप-मोबाईवर मेसेज करून टॉर्चर सुरू असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते. डॉक्टर हेमा, भक्ती आणि अंकिता यांच्याकडून सुरू असलेल्या प्रचंड मानसिक त्रासामुळे आपल्या मुलीची मानसिक स्थिती खराब झाल्यास आणि आपल्या मुलीचे बरेवाईट झाल्यास संबंधित तिन्ही डॉक्टर जबाबदार राहतील असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.