मुंबई, उल्हासनगरात शिवसेनेचे महापौर,भाजपला फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला असून महापौरपदी किशोरी पेडणेकर तर उपमहापौरपदी ऍड. सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. उल्हासनगर पालिकेतील सत्ताधारी भाजपला दणका देत शिवसेनेच्या लीलाबाई आशान महापौरपदी विराजमान झाल्या असून उपमहापौरपदी शिवसेना-आरपीआय युतीचे भगवान भालेराव विजयी झाले आहेत. लातूर महानगरपालिकेत बहुमत असतानाही भाजपला सत्ता गमवावी लागली असून काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे महापौरदी निवडून आले आहेत.

मुंबईच्या महापौरपदी अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर तर उपमहापौरपदी सुहास काडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकेकच उमेदकारी अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. उल्हासनगरमध्ये मित्रपक्षांशी विश्वासघात करणाऱया भाजपला सत्तेतून पायउतार करत शिवसेनेने पुन्हा एकदा पालिकेवर भगवा फडकवला. शिवसेना उमेदवार लीलाबाई आशान यांनी भाजप पुरस्कृत आघाडीच्या उमेदवार साई पक्षाच्या जीवन इदनानी यांचा दणदणीत पराभव केला. लातूरमध्ये सत्ताधारी भाजपच्या दोन नगरसेवकांनी उघडपणे बंड पुकारत महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला मतदान केल्याने बहुमत असतानाही सत्ता गमावण्याची नामुष्की भाजपवर आली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने एकहाती सत्ता काबीज करीत सलग पाचव्यांदा भगवा फडकावला. शिवसेना सध्या 94 नगरसेवकांसह पालिकेतील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे यावेळीही शिवसेनेचाच महापौर होणार हे चित्र याआधीच स्पष्ट झाले होते. यातच पुरेसे संख्याबळ नसल्याचे सांगत विरोधक आणि भाजपनेही महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरला नाही. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मावळते महापौर आणि निवडणुकीचे पीठासीन अधिकारी प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका सभागृहात विशेष सभेत महापौरपदासाठी एकमेव अर्ज आल्याचे सांगत मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. किशोरी पेडणेकर या मुंबई महानगरपालिकेच्या 77 व्या महापौर ठरल्या. निवडीनंतर किशोरी पेडणेकर यांनी मावळते महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडून पदभार स्वीकारला. यानंतर नवनियुक्त महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपमहापौरपदासाठी एकमेव अर्ज आल्याचे सांगत शिवसेनेचे ऍड. सुहास वाडकर यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

शिवसेनेच्या उमेदवारांची महापौरपदी निवड होताच मान्यवरांनी नवनियुक्त महापौरांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, युवासेनेचे वरुण सरदेसाई, सूरज चव्हाण, आमदार ऍड. अनिल परब, नीलम गोऱहे, सुनील शिंदे, सचिन अहिर, शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक, ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल पाटणकर, विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी महापौरांचे अभिनंदन केले.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीने चैतन्य
मुंबईच्या नवनियुक्त महापौरांचे अभिनंदन करण्यासाठी खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पालिकेत आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नवनियुक्त महापौरांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होत असताना मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा महापौर बिनविरोध विराजमान झाल्यामुळे ‘शतप्रतिशत’ आनंद होत असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली. मुंबईकरांसाठी आता आणखी चांगले काम होईल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित होते.

भगवे झेंडे, भगवी उपरणे, भगवे फेटे
महापौर शिवसेनेचा होणार असल्यामुळे संपूर्ण पालिकेतील वातावरण भगवेमय झाले होते. शिवसेनेचे सर्व नगरसेवक भगवे फेटे बांधून, भगवी उपरणी घेऊनच पालिकेत दाखल झाले होते. यावेळी महापौरपदी किशोरी पेडणेकर आणि उपमहापौरपदी ऍड. सुहास वाडकर यांच्या नियुक्तीची घोषणा होताच ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘शिवसेना झिंदाबाद’ ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. महापौरांच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर सर्व वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसह सर्वपक्षीयांनी नवनियुक्त महापौरांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

पालिका परिसर भगवामय!
मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार असल्यामुळे पालिका मुख्यालयाचा संपूर्ण परिसर सकाळपासूनच भगवामय झाला होता. ठिकठिकाणी भगवे झेंडे लावण्यात आले होते. महापौरपदाच्या घोषणेची वेळ जसजशी जवळ येत होती तस तसा नगरसेवक आणि शेकडोंच्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांचा उत्साह शिगेला पोहचत होता. सकाळी सुमारे 11.30 वाजताच्या सुमारास महापौरपदी किशोरी पेडणेकर आणि उपमहापौरपदी ऍड. सुहास वाडकर यांच्या नावाची घोषणा होताच पालिका परिसर ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘शिवसेना झिंदाबाद’ अशा घोषणांनी पालिका परिसर दणाणून गेला. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. शेकडोंच्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांनी ढोलताशांच्या तालावर ठेकाही धरला. यामध्ये भगव्या साडय़ा आणि भगव्या फेटेधारी महिलाही मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.

उल्हासनगरात दगाबाजीचा ‘बाजार’ उठला

मित्रपक्षांशी विश्वासघात करणाऱया भाजपला शिवसेनेने उल्हासनगरात शुक्रवारी जबरदस्त दणका दिला. भाजपला सत्तेतून पायउतार करत शिवसेनेने महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा डौलाने फडकवला. शिवसेनेच्या लीलाबाई आशान महापौरपदी विराजमान झाल्या. त्यांनी 43 मते मिळवत भाजप पुरस्कृत साई पक्षाच्या जीवन इदनानी यांचा दणदणीत पराभव केला. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करीत पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली.

उल्हासनगर महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला
विधानसभा निवडणुकीत ओमी कलानी यांना उमेदवारी देण्याचे भाजपने मान्य केले. मात्र ऐनवेळी भाजपचे माजी आमदार कुमार आयलानी यांना एबी फॉर्म देऊन भाजपने ओमी कलानी यांचा पत्ता कट केला. त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या टिम ओमी कलानीमध्ये भाजपविरोधात असंतोषाचा भडका उडाला. त्यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला सोडचिठ्ठी दिल्याचे जाहीर केले. याचवेळी दुसरा मित्रपक्ष असलेला अख्खा साई पक्ष भाजपने फोडून स्वतःच्या पक्षात विलीन केला होता. भाजपच्या या मित्रपक्षांना संपवण्याच्या राजकारणामुळे त्यांना धडा शिकवण्याचा निर्धार टिम ओमी कलानीने केला.

पंचम कलानी शिवसेनेच्या बाकावर बसल्या
शुक्रवारी महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपमधून फुटलेल्या टिम ओमी कलानीचे दहा नगरसेवक माजी महापौर पंचम कलानी यांच्यासह थेट शिवसेनेच्या बाकावर येऊन बसले. त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले. त्यांच्या नगरसेवकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मात्र शिवसेनेचे नगरसेवक धनंजय बोडारे, राजेंद्र चौधरी यांनी ही महासभा आहे, कोणी कुठेही बसू शकतो, असा मुद्दा मांडला आणि पीठासीन अधिकारी राजेश नार्वेकर यांनी तो मान्य केला. महापौरपदासाठी हात उंचावून मतदान झाले. त्यात शिवसेनेच्या उमेदवार लीलाबाई आशान यांना 43 तर भाजप पुरस्कृत साई पक्षाचे जीवन इदनानी यांना 35 मते मिळाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना-टिम ओमी कलानी-आरपीआय-आठवले गटाचे भगवान भालेराव यांना 44 तर भाजपच्या विजय पाटील यांना 34 मते मिळाली आहेत.

उल्हासनगर पालिकेत भाजप, टिम ओमी कलानी आणि साई पक्ष या आघाडीची सत्ता होती. या आघाडीकडे एकूण 44 इतके संख्याबळ होते. तर शिवसेनेकडे 25, राष्ट्रवादी 4, रिपाइं 4 व काँग्रेस 1 असे एकूण 35 इतके बलाबल होते. सत्ता स्थापनेसाठी किमान 40 मतांच्या मॅजिक फिगरची गरज होती.

लातूरमध्ये भाजपला झटका
लातूर महानगरपालिकेत बहुमत असतानाही महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला. काँग्रेस उमेदवार किक्रांत गोजमगुंडे हे भाजपचे शैलेश गोजमगुंडे यांचा धक्कादायकरीत्या पराभव करून महापौरपदावर विराजमान झाले आहेत. महापौरपदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचा एक नगरसेकक अनुपस्थित होता. भाजपच्या एका सदस्याचे निधन झाले आहे. त्यामुळे एकूण 68 सदस्यांनी हात उंच करून मतदान केले. विक्रांत गोजमगुंडे यांना 35 मते मिळाली तर भाजपचे ऍड. शैलेश गोजमगुंडे यांना 33 मते मिळाली. भाजप नगरसेवक चंद्रकांत बिराजदार आणि गीता गौड यांनी काँग्रेसला मतदान केल्याने भाजपचा पराभव झाला. राष्ट्रवादीच्या राजा मणियार यांनी काँग्रेसच्या बाजूनेच मतदान केले. लातूर महानगरपालिकेत भाजप 35, काँग्रेस 33 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 1 असे पक्षीय बालाबल आहे. अडीच वर्षांतच लातूर महापालिकेत सत्तांतर झाल्याने भाजप आणि माजी मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांना हा एकप्रकारे धक्काच असल्याचे बोलले जात आहे.