
अवघ्या 13 दिवसांत बीकाॅमचा निकाल लावला म्हणून पाठ थोपटून घेणाऱ्या मुंबई विद्यापीठाची प्रत्यक्ष परीक्षेत मात्र घोळांची मालिका सुरूच आहे. यावेळी एलएलबीच्या विद्यार्थ्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागला. परीक्षेत चुकीची प्रश्नपत्रिका दिल्याने तासाभराने प्रश्नपत्रिका बदलून पुन्हा परीक्षा घेण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली. वारंवार चुका करून विद्यार्थ्यांना वेठीस धरणारे विधी शाखेचे डीन आणि परीक्षा विभागाच्या प्रमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी युवासेनेने केली आहे.
एलएलबी 3 वर्षे अभ्यासक्रमाच्या द्वितीय सत्राच्या परीक्षेत हा प्रकार झाला. विद्यापीठाने बुधवारी रिपिटर विद्यार्थ्यांकरिता जुन्या अभ्यासक्रमावर आधारित ‘लॉ ऑफ क्राइम’ या विषयाची परीक्षा आयोजित केली होती; मात्र प्रश्नपत्रिकेत काही प्रश्न नव्या अभ्यासक्रमातील भारतीय न्याय संहितेवर आधारलेले होते. परीक्षेदरम्यान काही प्राध्यापकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी विद्यापीठाशी संपर्क साधल्यानंतर कुठे चुकीची प्रश्नपत्रिका पाठविल्याचे परीक्षा विभागाच्या लक्षात आले.
काॅलेजांना तातडीने सुधारित प्रश्नपत्रिका पाठवून परीक्षा घेण्यात आली. तोवर विद्यार्थ्यांना तासभर परीक्षा केंद्रांवर थांबावे लागले. अनेकांनी बराच पेपर सोडवला होता; परंतु नवी प्रश्नपत्रिका आल्यानंतर पुन्हा नव्याने सोडवावी लागली. काॅलेजांनी एक तास वाढवून दिल्याने परीक्षा दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास संपली. यात दुपारच्या सत्रात पुढील परीक्षा घेणाऱ्या काॅलेजांनाही मनस्ताप झाला.
राजीनामा द्या – युवासेनेची मागणी
आआधी एलएलबी तृतीय वर्ष सत्र पाच अभ्यासक्रमाच्या लेबर लॉ अॅण्ड इंडस्ट्रियल रिलेशन भाग दोन या विषयाच्या केटी अभ्यासक्रमाच्या परीक्षेतही चुकीची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला होता. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची ही घोळांची मालिका सुरूच आहे. वारंवार अशा चुका करून विद्यापीठ विद्यार्थ्यांना वेठीला धरत आहे. त्यामुळे विद्यापीठाने विधी शाखेचे डीन आणि परीक्षा विभागाच्या प्रमुखांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी युवासेनेचे नेते आणि सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केली.