मुंबई विद्यापीठाची केमिकल सायन्सेसमध्ये सहपदवी, अमेरिकेतल्या सेंट लुईस विद्यापीठाशी करार

मुंबई विद्यापीठाने अमेरिकेतल्या सेंट लुईस विद्यापीठासोबत करार करत विद्यार्थ्यांना केमिकल सायन्सेसमध्ये सहपदवी (जॉइंट डिग्री) घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. याआधी एमएस इन डेटा एनालिटिक्स आणि एमएस इन सायबर सिक्युरिटी या दोन अभ्यासक्रमांच्या सहपदवीला मान्यता देण्यात आली होती. त्याला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

नवीन वर्षापासून विद्यार्थ्यांना एम.एस. इन केमिकल सायन्सेसमध्येही सहपदवी मिळविता येईल. अमेरिकेतील सेंट लुईस विद्यापीठाशी झालेल्या करारानुसार विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाच्या दोन सत्रांचे शिक्षण मुंबई विद्यापीठात तर द्वितीय वर्षाच्या दोन सत्रांचे शिक्षण सेंट लुईस विद्यापीठात मिळणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कार्यांतर्गत प्रशिक्षण आणि इंटर्नशिपही करता येईल. विद्यार्थ्यांस दोन्ही विद्यापीठाची पदवी मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील केमिकल सायन्समधील विविध विषयांतील अध्ययनाच्या शाखा, संशोधन पद्धती, अद्ययावत प्रयोगशाळा आणि उपकरणांचा अभ्यास करता येईल. त्याचबरोबर दोन्ही विद्यापीठांतील पायाभूत व अनुषंगिक सुविधा, कौशल्य आणि आधुनिक उपकरणे आणि संसाधनाचा वापर करता यईल, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना सहाय्य

मागील वर्षी एमएस इन डेटा एनालिटिक्स आणि एमएस इन सायबर सिक्युरिटी या दोन अभ्यासक्रमांना प्रविष्ठ झालेले मुंबई विद्यापीठाचे दहा विद्यार्थी सेंट लुईस विद्यापीठात तिसऱ्या सत्राच्या शिक्षणासाठी प्रवेश घेणार आहेत. त्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षण शुल्कामध्ये 50 टक्के सवलत दिली जाईल. तसेच व्हिसा, समुपदेशन, कागदपत्रांचे साक्षांकीकरण, शिष्यवृत्ती सहाय्य, वसतिगृह सहाय्य यांकरिता सहाय्य केले जाईल.