
मुंबई विद्यापीठाने 2025मध्ये घेतलेल्या तृतीय वर्ष बीकाॅम सत्र-6 परीक्षेचा निकाल 55.47 टक्के इतका लागला आहे. अवघ्या 13 दिवसांत हा निकाल विद्यापीठाने जाहीर केला आहे. मात्र एबीसी आयडी किंवा अपार आयडीसाठी माहिती न दिल्याने 16,521 एवढय़ा विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.
एकूण 54,881 इतके विद्यार्थी परीक्षेला बसले होते. प्रत्यक्षात 53,671 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 15,445 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेचा निकाल मुंबई विद्यापीठाच्या http://www.mumresults.in/ या संकेतस्थळावर पाहता येईल.
एबीसी आयडी किंवा अपार आयडीकरिता माहिती न दिल्याने हे निकाल राखीव राहिले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या श्रेयांकांचा तपशील डिजिलॉकरवर उपलब्ध कण्याकरिता ही माहिती आवश्यक आहे. एबीसी आयडी विद्यार्थ्यांना एकत्रित केलेले श्रेयांक देशभरातील कोणत्याही विद्यापीठात हस्तांतरित व उपयोग करण्याची मुभा देते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
…म्हणून निकाल राखीव
विद्यापीठाने वारंवार परिपत्रके, सूचना काढून आणि महाविद्यालयांच्या बैठका घेऊन विद्यार्थ्यांच्या एबीसी आयडी विद्यापीठाच्या पोर्टलवर अपलोड करायच्या सूचना दिल्या होत्या. मात्र काही महाविद्यालयांनी अद्यापही काही विद्यार्थ्यांच्या एबीसी आयडीचा तपशील विद्यापीठाकडे सादर न केल्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आल्याची माहिती परीक्षा विभागाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी दिली.