
राज्य सरकारतर्फे विद्यापीठांतील अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याची घोषणा केल्यानंतर मुंबई विद्यापीठातर्फे परीक्षेच्या कामाला वेग आला आहे. या अंतिम वर्षातील परीक्षेसाठी कृती आराखडा तयार करण्याचे काम विद्यापीठाकडून सुरु करण्यात आले असून या अंतर्गत पदविका, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील 158 परीक्षांच्या नियोजनासह शैक्षणिक वेळापत्रक तयार केले जाणार आहे. या परीक्षांसाठी एकूण 2 लाख 22 हजार 581 विद्यार्थी प्रविष्ठ होणार असून या परीक्षांसाठीची नियमावली लवकरच जाहीर केली जाणार आहे.
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाच्या परीक्षा व शैक्षणिक वेळापत्रकाचे नियोजन करण्याकरीता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत केली होती. या समितीने 6 मे, 2020 रोजी आपला अहवाल शासनास सादर केला. त्या अनुषंगाने 08 मे, 2020 उदय सामंत यांनी परीक्षा आणि शैक्षणिक वेळापत्रकाबद्दल विद्यार्थी आणि भागधारकांशी संवाद साधत त्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने कृती आराखडा तयार करण्याच्या हालचालींना वेग वाढविला आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्गमित केलेली मार्गदर्शक तत्वे आणि राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठामार्फत तयार करण्यात येणाऱ्या कृती आराखड्यान्वये पदविका, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षातील अंतिम सत्राची परीक्षा घेताना सोशल डिस्टनसिंग, विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्य यांसह अनुषंगिक बाबींचा सखोल अभ्यास करुन परीक्षांचे नियोजन करण्यात येत असून त्याअनुषंगाने या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच विद्यापीठामार्फत जाहीर केले जाणार असल्याचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले. तसेच कोव्हिड-19 च्या उद्रेकामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा आणि त्यांच्या शैक्षणिक हितासाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी विद्यापीठामध्ये विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष आणि हेल्पलाईन सुरु करण्यात येणार असून परीक्षांसाठी तसेच शैक्षणिक वेळापत्रकाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि सहाय्य मिळण्यासाठी जिल्हानिहाय समुपदेशनाची सोय लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
परीक्षा आणि शैक्षणिक वेळापत्रकाचे नियोजन करण्यासाठी कृती आराखडा तयार झाल्यावर महाविद्यालयांसाठी परीपत्रक, परीक्षांचे वेळापत्रक, आसनव्यवस्था, आणि विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे जाहिर केली जाणार असल्याचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. तर या कृती आराखड्यान्वये ग्रेडींग पॅटर्न, एटीकेटी, दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील वार्षिक परीक्षा पद्धतीनुसार प्रविष्ठ झालेले विद्यार्थी, महाविद्यालयांच्या शंकांचे निरसन यासह अनुषंगिक बाबींचा सखोल अभ्यास करून सविस्तर मार्गदर्शक सूचना परिपत्रकान्वये लवकरच निर्गमित केल्या जाणार आहेत.
























































