
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमधील बीए, बीकॉम, बीएस्सी या पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबरच बँकिंग अॅण्ड इन्शुरन्स, अकाऊंटिंग अॅण्ड फायनान्स, बीएमएस, बायो टेक्नॉलॉजी यांसारख्या स्वयंअर्थसहाय्यित (सेल्फ फायनान्स) अभ्यासक्रमांच्या शुल्कात 500 ते आठ हजार रुपयांपर्यंतच्या शुल्कवाढीला मान्यता देण्यात आली आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून कॉलेजांना वाढीव शुल्करचना लागू करता येईल.
मुंबई विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने गेल्या वर्षी शुल्कवाढीला मान्यता दिली होती. नुकतेच विद्यापीठाने शुल्कवाढीसंबंधी परिपत्रक काढले. यामुळे तब्बल 17 वर्षांनी कॉलेजांना शुल्कवाढ करता येणार आहे, मात्र सरकारकडून अनुदानाला लावण्यात आलेली कात्री, वाढता खर्च यामुळे ही शुल्कवाढ अपुरी असल्याची कॉलेजांची तक्रार आहे.
कमाल आठ हजार रुपयांची वाढ
कला, वाणिज्य या पारंपरिक शाखांचे शुल्क 3,970 वरून 4,501 इतके होणार आहे, तर बँकिंग अॅण्ड इन्शुरन्स, अकाऊंटिंग अॅण्ड फायनान्स, बीएमएस, कम्प्युटर सायन्स, बायो टेक्नॉलॉजी यांसारख्या स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांचे शुल्क साधारण आठ हजारांनी वाढविण्यात आले आहे.
17 वर्षांनी शुल्कवाढ
याआधी 2008 मध्ये विद्यापीठाने शुल्कवाढ केली होती. त्यानंतर 2012 साली शुल्कवाढीचा प्रस्ताव होता, परंतु त्याला विद्यार्थी संघटनांनी विरोध केल्यानंतर तो मागे घेण्यात आला.