Recipe : मोसम ‘श्रावण’भाज्यांचा!

2827

सामना ऑनलाईन । मुंबई

पावसाळा या ऋतुमधला सगळ्यात हिरवागार आणि तितकाच मनमोहक काळ म्हणजे श्रावण महिना. म्हणूनच मराठी वर्षामधल्या सर्वात महत्त्वाच्या महिन्यांमध्ये श्रावण या महिन्याचं नाव घेतलं जातं. कधी ऊन तर कधी पाऊस, बहरलेली सृष्टी, तरारून उठलेली पिकं आणि सोबत पिकणाऱ्या चवदार भाज्या. यांमुळे मांसाहार वर्ज्य असला तरी त्याचं फारसं दुःख असत नाही. गमतीचा भाग जाऊ द्या, पण अनेक पिढ्यांची परंपरा लाभलेल्या या खास श्रावणात उगवणाऱ्या भाज्या आपल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. सध्याच्या काळात दुर्मीळ होत चाललेल्या या श्रावणभाज्यांच्या रेसिपी खास सामना ऑनलाईनच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत.

भोपळ्याच्या वेलाची भाजी

पहिल्या पावसानंतर भोपळ्याच्या बिया रुजत घालतात. आठ-दहा दिवसांत त्या रुजून येतात. त्या बियांचे वेल फुटतात. वेलींना तणावे येत असताना त्याच्या टोकाच्या कोवळ्या वेलाची पानांसकट भाजी करतात.

साहित्य : भोपळ्याचे कोवळे पानांसह वेल, कांदा, ओली मिरची, मुगाची किंवा तुरीची डाळ, ओले खोबरे, तेल किंवा मुठले (कोकम तेल), मीठ व चवीमनुसार गूळ वापरा.

bhaji-bhopla

कृती : भोपळ्याच्या कोवळ्या वेल धुवून बारीक चिरावे. कढईत थोडे तेल घालून त्यात बारीक कांदा टाकून परतावा. मग त्यात भिजवलेली डाळ टाकून थोडी शिजू द्यावी. अर्धी शिजलेली डाळ असताना त्यावर चिरलेली भाजी व चवीनुसार गूळ घालून भाजी झाकण घालून शिजवावी. शिजलेल्या भाजीत चवीपुरते मीठ व ओले खोबरे घालून भाजी परतून उतरवावी.ही भाजी छान चविष्ट लागते.यात भरपूर लोह व क्षार असतात.

भोपळ्याच्या फुलांची भाजी

भोपळ्याची केशरी रंगाची मोठी फुले भाजीसाठी वापरतात.

साहित्य : भोपळ्याची फुललेली देठासह फुले, कांदा, ओली मिरची किंवा लाल तिखट पूड, ओले खोबरे, फोडणीसाठी तेल, मीठ.

pumpkin-flower-bhaji

कृती : भोपळ्याची फुले बरीच नाजूक असतात. त्यामुळे धुताना सावकाश हळूवार धुवावीत, जास्त वेळ पाण्यात ठेवू नयेत. फुले बारीक चिरावी. ही भाजी तेलावर परतून करावी. त्यासाठी कढईत तेल घालून तापवावे. त्यात भरपूर कांदा घालून परतावा. आवश्यक वाटेल तितकीच ओली मिरची किंवा लाल तिखट घालून कांद्यासह परतून घ्यावे. त्यावर चिरलेली भोपळ्याची फुले टाकून मऊ होईपर्यंत परतून घ्यावीत. चवीपुरते मीठ व ओले खोबरे घालून भाजी उतरवावी.
भोपळ्याच्या वेलाच्या भाजीपेक्षाही फुलात अधिक लोह असते.

करटुलं (कंटोल)

साहित्य : आठ ते दहा हिरवी कोवळी करटुलं (साधारण पाव किलो), अर्धी वाटी ओले खोबरे, एक वाटी बारीक चिरलेला कांदा, फोडणीकरता हिंग व मोहरी, मीठ, हळद, दोन-तीन चिरलेल्या मिरच्या, थोडंसं लाल तिखट, दोन टेबल स्पून तेल.

kartule-bhaji

कृती : प्रथम करटुलांचे अर्धे भाग करून त्यातील गर काढून टाकावा. नंतर बटाटय़ाचे काप केल्याप्रमाणे करटुलं चिरून घ्यावीत व थोडंसं मिठ लावून धुवून घ्यावीत. पॅनमध्ये तेल गरम करुन हिंग, मोहरी, थोडेसे जीरे टाकून फोडणी घालावी, त्यात चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्याही टाकाव्यात. नंतर त्यात कांदा, मिठ, थोडेसे लाल तिखट व हळद घालून चांगले परतावे. चिरलेली करटुलं त्यात घालून पुन्हा परतावीत. झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यावी. नंतर झाकण काढून मंद गॅसवर तीन ते चार मिनिटे भाजी पाणी न घालता परतावी. वरून ओले खोबरे व चवीपुरती साखर घालावी.

शेवग्याच्या पानाची भाजी

कोकणात शेवगा न म्हणता ‘शेगुल’ असे म्हणतात. शेगुलाच्या पाल्याची भाजी रुचकर असली तरी ही भाजी कोवळी असतानाच करतात. गोकुळाष्टमीला कोकणातल्या प्रत्येक घरात ही भाजी कांद्याशिवाय केली जाते.

साहित्य : शेगुलाची कोवळी पाने, कांदा, ओली मिरची, फोडणीसाठी तेल, मीठ, ओले खोबरे, चवीपुरता गूळ, हळद, फणसाच्या आठळ्या.bhajiiiiiiii

कृती : शेगुलाची कोवळी पाने धुवून चिरावी. कढईत तेल घालून त्यावर बारीक चिरलेला कांदा व फणसाच्या आठळ्याचे बारीक तुकडे घालून परतून घ्यावे. आठळ्याचे तुकडे शिजल्यावर त्यावर ओली मिरची, चिरलेली शेगुलाची पाने व मीठ, गूळ घालून झाकण लावून वाफ काढावी. भाजी शिजते लवकर म्हणून ओले खोबरे घालून भाजी उतरवावी.
या भाजीला आवडत असल्यास वरून लसणीची फोडणी द्यावी. भाजी अधिक रुचकर होते.
शेवग्याच्या झाडापासून कॅल्शियम, लोह व इतर उपयुक्त क्षार भरपूर मिळतात. भाजीतून हे सारे घटक आपल्या शरीराला मिळतात. तसेच ही पाने तंतूमय असल्याने सारक म्हणूनही चांगली असतात.

पालकाची कढी

साहित्य : पाव किलो अर्थात एक गड्डी पालक, १०० ग्राम हरभऱ्याच्या डाळीचे पीठ, १०० ग्राम दही, जिरे, हिंग, तिखट, हळद, हिरव्या मिरचीचे काप, मीठ चवीनुसार

careeeeee

कृती : दही छान पातळ करून घ्यावे. त्यात हरभऱ्याच्या डाळीचे पीठ घालून घोळून घ्यावे. पालकाची पाने धुवून घ्यावीत आणि चाकुने चिरावीत. कढईत तेल गरम करून त्यात हिंग, जिऱ्याची फोडणी घालावी. फोडणी होत असतानाच त्यात बाकीचा मसाला घालावा. आता त्यात चिरलेला पालक घालावा आणि लालसर परतावे. नंतर या मिश्रणात पातळ केलेले दही घालून छान उकळी येऊ द्यावी.

अळूचे फदफदे

अळूची भाजी सर्वांना परिचित आहे. पावसात रुजून येणारे ‘तेर अळू’ हे सुध्दा काळ्या अळू एवढेच कोकणातल्या लोकांना प्रिय आहे. अळूगाठी भाजी ही फक्त काळ्या किंवा तेर अळूच्या पानांची करतात. यात अळूंच्या देठांचा वापर करत नाहीत. या भाजीसाठी अळूची पाने धुवून पाटाखाली दाब देऊन ठेवतात. या पानांच्या उभ्या पट्टय़ा कापून, गुंडाळून त्यांच्या गाठी करतात. मग या गाठी भाजीसाठी वापरतात.

साहित्य : अळूंच्या पानांच्या गाठी, धणे, मिरी, ओल्या मिरच्या, ओले खोबरे, मीठ, आमसोल/ चिंच, गूळ, हळद, फोडणीसाठी मोहरी व मुठले (कोकम तेल), तांदळाची पिठी, भिजवलेले वाटाणे/ चवळी.

aalu-faf

कृती : अळूच्या गाठी वाफवून घ्याव्यात. धणे, मिरी, ओल्या मिरच्या व ओले खोबरे बारीक वाटावे. गाठी मऊ झाल्या की त्यावर चिमूटभर हळद, मीठ, चवीपुरता गूळ, तांदळाचे भिजवलेले पीठ व तयार वाटण घालून चांगली उकळी काढावी. त्यात आमसोल किंवा चिंचेचा कोळ (आंबटपणासाठी) घालावा. (आंबाडय़ाच्या दिवसात त्यात आंबटपणासाठी आंबाडे घातले तर चव आणखी छान लागते.)

या भाजीत भिजवलेले काळे वाटाणे किंवा चवळी किंवा फणसाच्या आठळ्यांचे तुकडे भिजवून घातले तर भाजी आणखीन रुचकर लागते.
या भाजीत लोहाचे प्रमाण अधिक असते.

अळंबीची भाजी

कोकणात पावसाच्या सुरुवातीला जेव्हा मातीचा वास येतो तेव्हा अळंबी रुजून येतात. यामध्ये खाण्यायोग्य अळंबीची जात म्हणजे सोनअळंबी होय. अळंबीचे कळे, फुललेली अळंबी, खाण्यासाठी वापरली जात नाहीत. जंगलात, वारुळाच्या मातीवर, झाडाच्या बुंध्यावर किंवा घराच्या आजुबाजूला ही खाण्यायोग्य अळंबी रुजून येतात. सोनअळंबी आकाराने लहान असतात आणि अधिक रुचकर असतात; परंतु वापरण्यापूर्वी ही मिठाच्या पाण्यात घालून स्वच्छ धुवून घ्यावी लागते.

साहित्य : अळंबी, कांदा, बारीक चिरलेली लसूण, मसाला, खोबरे, हळद, मीठ व फोडणीसाठी तेल.

alambii

कृती : अळंबी छोटी असल्यास हाताने बारीक तुकडे करून घ्यावे. भांडय़ात थोडे तेल घ्यावे आणि त्यात चिरलेला कांदा व लसूण तसेच मसाला घालून परतून घ्यावे. त्यावर अळंबीचे तुकडे घालून सर्व पुन्हा परतून घ्यावे. एक वाफ काढावी. मिठाच्या पाण्यातून धुवून घेतल्यामुळे भाजीला मीठ कमी टाकावे. ओले खोबरे टाकून भाजी हळू हाताने परतून घ्यावी व थोडी वाफ येऊ द्यावी आणि भाजी उतरवावी.
हीच भाजी ‘रस्साभाजी’ अशी तयार करायची असल्यास खोबऱ्याचे बारीक वाटण घालून उकळी काढावी.
अळंबीमध्ये प्रथिनाचे प्रमाण खूप अधिक असते. तसेच भरपूर क्षारही असतात. पचायलाही तशी सोपी असते.

आपली प्रतिक्रिया द्या