मुंबई-विजयदुर्ग ‘रो-रो’ आता दिघी, जयगड, वेंगुर्ल्यातही थांबणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई ते विजयदुर्ग एमटूएम रो-रो नुकतीच सुरू झाली. शुभारंभाच्या फेरीत तिने मुंबईतील भाऊचा धक्का येथून सात तासांत कोकणातील विजयदुर्ग जेट्टी गाठली. त्यानंतर दुसऱया दिवशी ती रो-रो विजयदुर्ग येथून पुन्हा मुंबईला परतली. मुंबईकर आणि कोकणवासीयांचा रो-रोला प्रतिसाद वाढत असल्याने आता तिचे थांबेही वाढणार आहेत. येत्या महिनाभरात ही रो-रो मुंबई-विजयदुर्गदरम्यान रायगडमधील दिघी, रत्नागिरीतील जयगड आणि सिंधुदुर्गातील वेंगुर्ला येथे थांबा घेणार आहे.

महाराष्ट्र सागरी महामंडळाने (एमएमबी) हा निर्णय घेतला आहे. दिघी, जयगड आणि वेंगुर्ला येथे या रो-रोला उभे करण्यासाठी जेट्टीचे काम करण्यात येत आहे. 40 वर्षांपूर्वी मुंबईतील चाकरमानी बोटीने कोकणात जात होते. त्यावेळी मुंबईहून निघणाऱया बोटीचा पहिला थांबा रत्नागिरीतील जयगडला होता. दुपारी 12 च्या दरम्यान मुंबईहून सुटणारी बोट पहाटे 3 पर्यंत जयगडच्या किनाऱयाला लागायची. पंधरा वर्षांपूर्वी छोटय़ा बोटी उभ्या राहतील इतक्या क्षमतेचे दिघी बंदर आता आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून विकसित झाले आहे. वेंगुर्ला येथेही समुद्राचा विस्तार मोठा असल्याने तिथे जलवाहतुकीसाठी मोठी संधी आहे. रो-रोच्या माध्यमातून कोकणच्या पर्यटनाला अधिक चालना मिळणार आहे.

लवकरच मुंबई-नेरूळ बोट

महाराष्ट्र सागरी महामंडळामार्फत मुंबई ते नेरूळ जलवाहतूक सेवाही लवकरच सुरू केली जाणार आहे. त्या सेवेमुळे मुंबई आणि नवी मुंबई जलमार्गाने जोडली जाईल आणि दोन्हीकडील प्रवाशांना प्रवासाचा एक नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.