
सामना प्रतिनिधी। मुंबई
कांदिवली पश्चिमच्या लालजी पाडा येथे एसआरएच्या इमारतीची भिंत कोसळून रमेश सिंग (18) या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. रात्री उशिरापर्यंत संबंधित कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती.
कांदिवलीच्या लालजी पाडा येथे एसआरएच्या एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी रमेश आणि जखमी सुमित लकडा हे दोघे कामगार कामाला होते. आज सकाळी इमारतीच्या साइड येथील माती ढासळल्याने भिंत कोसळली. त्या अपघातात हे दोघे जखमी झाले. स्थानिकांनी अग्निशमन दल आणि कांदिवली पोलिसांना कळवली. जखमी अवस्थेत रमेशला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर जखमी सुमितवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.























































