
मुंबईकरांना पाणीपुरवठा होणाऱया सातही तलावांत या वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे गेल्या वर्षीच्या पाणीसाठय़ाचे रेकॉर्ड तोडले असून मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकटही टळले आहे. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी 13,23,541 दशलक्ष लिटर पाणीसाठा होता तर या वर्षी 14,33,404 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी 30 ऑक्टोबर रोजी तलावांतील एकूण पाणीसाठय़ात तब्बल 8 टक्के जास्त जलसाठा जमा झाला आहे.
मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3958 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मुंबईकरांना वर्षभर पुरेसे पाणी मिळण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी सातही धरणांत मिळून 14,47,363 दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्यक असते. मात्र गेल्या वर्षी तलाव क्षेत्रात परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे 1 ऑक्टोबर 2018 रोजी तब्बल 2 दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी असल्याचे समोर आले होते. त्यामुळे पाणीसाठय़ाचे नियोजन करून मुंबईकरांना पुरेसे पाणी देण्यासाठी नोव्हेंबरपासून 10 टक्के पाणीकपात करावी लागली होती. मात्र जुलै संपण्याआधीच 80 टक्के पाणीसाठा जमा झाल्याने 20 जुलैपासून 10 टक्के पाणीकपात रद्द करण्यात आली होती.




























































