
मागील अनेक दिवसांपासून सुखद गारवा अनुभवणारे मुंबईकर मंगळवारी पहाटे अक्षरशः गारठले. सोमवारी रात्रीपासून थंडीची तीव्रता वाढली आणि पहाटे किमान तापमानाचा पारा थेट 16 अंशांपर्यंत खाली घसरला. पुढील आठवडाभरात शहर आणि उपनगरांत थंडीचा कडाका आणखी वाढेल, पारा 15 अंशांच्या नीचांकी पातळीवर जाईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
गेल्या आठवडय़ापासून मुंबईत थंडीची तीव्रता वाढली आहे. उत्तर हिंदुस्थानातून कोकण किनारपट्टीच्या दिशेने प्रवाहित झालेल्या थंड वाऱयांमुळे गारवा आणखीन वाढला आहे. रविवारी किमान तापमानात अचानक चार अंशांची मोठी घट झाली होती. तीच घसरण सोमवारीही कायम राहिली आणि रात्री थंडीची तीव्रता वाढली. नंतर पहाटेच्या सुमाराला किमान तापमानाचा पारा 16 अंशांपर्यंत खाली आल्यामुळे मुंबईकर कुडकुडले.
संपूर्ण राज्यभरात थंडीची लाट धडकली आहे. बहुतांश जिह्यांमध्ये मंगळवारी किमान तापमान 11 ते 12 अंशांच्या आसपास नोंदवण्यात आले. नाशिक जिह्यात सर्वात कमी 11.4 अंश तापमानाची नोंद झाली. राज्याच्या ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागात तापमानामध्ये मोठी घसरण झाली आहे.





























































