मुंबईकरांना मिळाले 128 टिकाऊ, मजबूत रस्ते; मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांना आरोग्य, शिक्षण, पाणी, वीज यासारख्या सुविधा माफक दरात उपलब्ध करून देणार्या मुंबई महापालिकेने पावसाळ्याआधी रस्त्यांची कामे पूर्ण करून मुंबईकरांना 128 टिकाऊ आणि मजबूत रस्ते दिले आहेत तर 435 रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असून पावसाळ्यानंतर या रस्त्यांची कामे सुरू करण्यात येतील, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता विशाल ठोंबरे यांनी दिली.

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरात वर्षभर विकासकामे सुरू असून पायाभूत सुविधांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले जात असतात. मुंबईकरांना मजबूत आणि टिकाऊ रस्ते मिळावे, यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहर व दोन्ही उपनगरात मिळून एकूण 788 रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी आतापर्यंत 128 रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यापैकी 83 रस्ते शहरातील, पूर्व उपनगरातील 28 व पश्चिम उपनगरातील 17 रस्ते आहेत. यापैकी बहुतेक रस्ते सिमेंट काँक्रिटचे आहेत. मात्र, पावसाळ्यात रस्त्यांची कामे करताना तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे तूर्तास रस्त्यांची कामे थांबवण्यात आली आहेत. पावसाळा संपल्यानंतर 1 ऑक्टोबरनंतर रस्त्यांची ही कामे नियमितपणे सुरू होणार आहेत तर विविध कारणांमुळे 218 रस्त्यांची कामे अजूनही सुरू करण्यात आलेली नाहीत, असे महापालिकेच्या रस्ते विभागाने म्हटले आहे.

कामांवर सीसीटीव्हीची नजर

मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत दोन हजार किलोमीटरचे रस्ते असून रस्त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीची कामे महापालिकेचा मध्यवर्ती विभाग आणि कंत्राटदारांच्या माध्यमातून केली जातात. ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत, त्या ठिकाणच्या कामाचे थेट प्रक्षेपण रस्ते विभागातील अधिकाऱ्यांना दाखवणे कंत्राटदारांना बंधनकारक करण्यात आले आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून कामाच्या दर्जावर लक्ष ठेवले जाते. डांबराचे रस्ते पावसाळ्यात अधिक लवकर खराब होत असल्याने त्याऐवजी सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनवण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे रस्त्यांचे आयुष्य वाढते आणि रहिवाशांना सुरक्षित रस्ते मिळतात.

एकूण रस्त्यांची कामे – 788
शहर – 365, पूर्व उपनगर – 200, पश्चिम उपनगर – 223
प्रगतीपथावर असलेली कामे – 435
शहर -167, पूर्व उपनगर- 119, पश्चिम उपनगर – 149